भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे आयोजन
पुणे : स्वयें श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती…राम जन्मला ग सखे राम जन्मला… अशी गीत रामायणातील अजरामर पदे, तबल्यावरील तालमय ठेका… अप्रतिम पदलालीत्याने नृत्य कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केलेले विविध प्रसंग, सुंदर अभिनयाने रंगमंचावर रामायण सादर करणारे कलाकार अशा नृत्य, नाट्य, ताल आणि सूर यांनी भारलेल्या वातावरणात सत्रीय या आसामच्या प्राचीन नृत्यकलेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे गीतरामायण कलाकारांनी रसिकांपुढे अक्षरशः जिवंत केले.
ज्येष्ठ तबलावादक किशोर कोरडे यांनी अप्रतिम तबलावादनाने बनारस घराण्याची परंपरा उलगडली, तर सत्रीय नृत्यांगना डॉ. देविका बोरठाकूर आसामच्या सत्रीय नृत्यशैलीचे बारकावे अगदी नजाकतीने उलगडले.
इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि भारतीय विद्यापीठ अभिमात विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देविका बोरठाकूर यांच्यासह स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे विद्यार्थी यांनी सत्रीय नृत्यशैलीच्या माध्यमातून गीत रामायणातील विविध प्रसंग रसिकांसमोर सादर केले. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स च्या पुणे विभागाचे प्रमुख राजकुमार, मुकुल माडगूळकर, नृत्यगुरू सुचेता चापेकर, स्वाती दैठणकर, सुचेत्रा दाते, डॉ. विवेक रणखांबे यावेळी उपस्थित होते.
तबलावादनाने किशोर कोरडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. विविध प्रकारचे ठेके आणि ताल यांच्या माध्यमातून त्यांनी बनारस घराण्याची तबलावादनाची परंपरा रसिकांसमोर उलगडली. देविका बोरठाकूर यांच्यासह अक्षता माने, साक्षी गायकवाड, योशा रॉय,तन्वीर लांबा, बिपांची बोरठाकुर,ओशीन झाडे या विद्यार्थीनींनी सादरीकरण केले.
निकिता लेले, परिमल कोल्हटकर (गायन), हृषीकेश सुरवसे (तबला), वरद सोहनी (संवादिनी),
ओंकार उजागरे (सिंथेसायजर), निषाद चिले (साईड रिदम) यांनी साथसंगत केली. सांगीतिक संकल्पना आणि संयोजन प्रवीण कासलीकर आणि नृत्य दिगदर्शन डॉ.देविका बोरठाकुर यांचे होते.
डॉ. विवेक रणखांबे म्हणाले, नृत्य, नाट्य, गीत, गायन आदी विविध कलांच्या संगमातून आज सत्रीय ही आसामी नृत्यशैली रसिकांना अनुभवता आली. तसेच या महान कलेच्या माध्यमातून मराठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाृला गारुड घातलेले गीतरामायणही या माध्यमातून रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. रसिकांना दोन महान कलांचा संगम अनुभवायला मिळाला.