पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी लोहगाव विमानतळ टर्मिनल २ सुरू व्हावे, यासाठी काँग्रेस पक्षाने आंदोलने केली, सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे येत्या १९ फेब्रुवारीला त्याचे उदघाटन होते आहे, काँग्रेसच्या लढ्याला आलेले हे यश आहे, असे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वाहतूक कोंडी सुटावी याकरिता शिवाजीवर एसटी स्थानक पूर्ववत जागी यावे, अशी मागणी घेऊन काँग्रेस पक्षाने आंदोलन केले, त्याला यश मिळाले. त्यानंतर लोहगाव विमानतळावरील टर्मिनल २ वापरासाठी खुले व्हावे, अशी विमान प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन, काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. ऑगस्ट २०२३मध्येच टर्मिनलचे २ चे काम पूर्ण झाले होते. चाचण्याही झाल्या होत्या. केवळ पंतप्रधानांना सोयीची वेळ मिळावी यासाठी उदघाटन लांबवले जात होते. ही बाब लक्षात आल्यावर डिसेंबर महिन्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन पाठविले आणि जानेवारी महिन्यात टर्मिनल २ खुले करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विमान प्रवाशांशी संवाद साधला आणि मागणीचा रेटा निर्माण केला. यामुळे मंत्रीमहोदयांनी घाईघाईने विमानतळाची पाहाणी केली आणि आता १९ फेब्रुवारीला उदघाटन होत आहे. काँग्रेसच्याच पाठपुराव्याला आलेले हे यश आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी पुणे हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. याकरिता गतीमान विमानसेवा ही गरज आहे. लोहगाव विमानतळावर वर्षाकाठी ७०लाख प्रवासी असतात. ती संख्या आता ९०लाखावर गेली, हे ही लक्षात घ्यायला हवे होते. वाढत्या गर्दीमुळे विमान लॅन्डिंगमध्ये अडथळे येत होते. अनेक गैरसोयी निर्माण झाल्या. विमानतळाला एसटी स्थानकासारखे स्वरूप आले होते. त्यात लक्ष घालून टर्मिनल २ वापरासाठी खुले करण्याऐवजी भारतीय जनता पक्ष श्रेयाचे राजकारण करू लागला, तो प्रकार संतापजनक होता, असे मोहन जोशी पत्रकात म्हटले आहे.