हवेली, भोरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा! दोन दिवसांच्या मोहिमेत दोन महाकाय होर्डिंग जमीनदोस्त
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत होर्डिंगविरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, गेल्या दोन दिवसांत हवेली आणि भोर तालुक्यात जोरदार कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत दोन महाकाय होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले असून, आगामी काळातही हे ‘कारवाईसत्र’ सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.एकीकडे हे चित्र असताना पुण्यात मात्र नव्याने होर्डींग्ज उभारू नका हे आदेश पायदळी तुडवून असे होर्डींग्ज उभारणे सुरु असून अनधिकृत होर्डींग्ज वर कारवाई होण्याऐवजी त्यांना राजकीय संरक्षण मिळते आहे कि काय ? असा प्रश्न निर्माण झालेल्या राजकारणाने उपस्थित होत आहे . होर्डींग्ज धोरणच काय आता प्रत्येक प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार कि काय ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे आता हे धोरण जागरण करणार की साईन पोस्ट वर थांबणार असा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान इकडे अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंगमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशावरून व अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी हवेली तालुक्यातील खेड शिवापूर (पश्चिम) येथे पथकाने धडक कारवाई केली. येथील गट क्रमांक २७२ मध्ये ‘ईश्वरी ॲड्स’ या संस्थेने अनधिकृतपणे उभारलेले होर्डिंग हटवण्यात आले.
यापूर्वी सोमवारी भोर तालुक्यातील कामथडी येथे मोठी कारवाई करण्यात आली. येथील गट क्रमांक ७५१ मधील ‘बी. के. नाईक अँड सन्स’ यांच्या मालकीचे अजस्र होर्डिंग प्रशासनाने काढले. दोन दिवसांच्या या मोहिमेत होर्डिंगचे लोखंडी सांगाडे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

