पुणे बाल पुस्तक जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : उन्हाळी सुटीचा रविवार पुणेकर मुले आणि पालकांसाठी पुस्तक खरेदीचा ठरला. पुणे बाल पुस्तक जत्रेत पालक-मुलांनी भरभरून पुस्तक खरेदी करून सुट्टी वाचनमय करण्याची तयारी केली आहे. तसेच रविवारी झालेल्या कार्यक्रमांतून कथा कवितांसह विमानांचे विज्ञान समजून घेण्याची संधी मुलांनी पुरेपूर अनुभवली.
पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, समर्थ युवा फाउंडेशन आणि संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंच परिसरात पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत पारंपरिक भारतीय खेळ, खाऊगल्ली, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध झाली आहे. ३० एप्रिलपासून सुरू झालेल्या या पुस्तक जत्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी सकाळच्या सत्रात बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांचा ‘कथा कवितांच्या राज्यात’ हा कार्यक्रम झाला. आव्हाड यांनी मुले आणि पालकांशी संवाद साधत कथा-कवितांच्या राज्याची मनोरंजक सफर घडवून आणली. दुपारच्या सत्रात हवेत उडणाऱ्या विमानांमागील विज्ञान समजून घेण्याची संधी मुले आणि पालकांना ‘सलाम भारतीय वायुसेनेला’ या कार्यक्रमातून मिळाली. ज्येष्ठ एअरो मॉडेलर सदानंद काळे यांनी या कार्यक्रमात अत्यंत रंजक पद्धतीने विमानांचे विज्ञान उलगडले. तसेच मिग २१, राफेल, जॅग्वार अशा लढाऊ विमानांची माहिती सांगितली. विमान तयार करण्याची प्रात्यक्षिकेही दाखवली. या कार्यक्रमाला पालक, मुलांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तरांनी या सत्राची रंगत वाढवली. ड्रोन इंडस्ट्री वाढत असताना या क्षेत्रातील करिअरसंधींबाबत माहिती दिली. यावेळी मुले पारंपरिक जुने खेळ खेळण्यात हरवून गेली होती.
कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच पुस्तकांची दालनेही पालक-मुलांनी गजबजलेली होती. गोष्टींची पुस्तके, बालकादंबरी, विज्ञानावरील पुस्तके, शास्त्रज्ञांच्या गोष्टी अशी विविध प्रकारची पुस्तकांची भरभरून खरेदी करण्यात आली. ‘पुणे बाल पुस्तक जत्रा हा उन्हाळी सुटीतील महत्त्वाचा उपक्रम झाला आहे. या जत्रेमुळे मुले, पालक पुन्हा पुस्तकांकडे वळत आहेत. पुस्तकांतील नवे प्रयोग बालवाचकांपर्यंत पोहोचत आहेत. जत्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रकाशक म्हणून उत्साह दुणावला आहे,’ अशी भावना प्रकाशकांनी व्यक्त केली.
आज जत्रेचा समारोप
बालपुस्तक जत्रेचा सोमवारी (४ मे ) सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. त्या पूर्वी सकाळी १०.३० वाजता ‘स्क्रीन टाइम कसा आणि कुठे?’ या सत्रात डॉ. श्रुती पानसे, स्मिता पाटील वळसंगकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाच्या मोहिनी भुसे आणि सहकारी संबळ गोंधळ आणि अन्य गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. समारोप कार्यक्रमानंतर ‘बाल गीत रामायण’ कार्यक्रम होणार आहे.
बालपुस्तक जत्रेला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जत्रेत मोठ्या प्रमाणात झालेली पुस्तक खरेदी आनंददायी आहे. या पुस्तकांमुळे उन्हाळी सुटी भरपूर वाचनाची होईल हा विश्वास वाटतो.
- राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

