मुंबई-ज्याला लाख म्हणजे काय अन् कोटी म्हणजे काय, हे कळत नाही. तेच आता देशामध्ये मंडल आयोगाला विरोध करणार आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा,असे माझे त्यांना आव्हान आहे असे वक्तव्य येथे अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.ते एका जातीसाठी लढत आहेत, मी मात्र 374 जातींसाठी लढत आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.
झुंडशाहीपुढे नमते घेऊन लाखो लोकांना ओबीसी आरक्षणात बॅकडोअर एंट्री दिली जात आहे. पुन्हा त्यांचे सगेसोयऱ्यांच सुरु झाले आहे. त्यामुळे आम्हाला आमदार, खासदार, प्रशासन आणि कोर्टाकडे दाद मागावी लागणार आहे. लोकशाहीने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्याचा आम्ही वापर करणार आहोत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाचे जे माहितीगार आहेत, अभ्यासक आहेत.. ते म्हणतायत की, आम्हाला मराठा म्हणून वेगळे आरक्षण द्या. परंतु सध्या झुंडशाहीपुढे नमते घेऊन निर्णय घेतले जात आहेत. आमच्या आरक्षणाला धक्का लागला जावू नये.
मंत्री छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, त्यांच्याएवढा (मनोज जरांगे) ज्ञानी हिंदुस्थानात दुसरा कोणी आहे का? तीन कोटी लोक मुंबईत आणणार होते.. बघितले सगळ्यांनी वाशीमध्ये. ज्याला लाख म्हणजे काय अन् कोटी म्हणजे काय, हे कळत नाही. तेच आता देशामध्ये मंडल आयोगाला विरोध करणार आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा, माझे त्यांना आव्हान आहे. गावागावात तीन-चार दिवसांपासून उन्मादी उत्सव सुरु आहे. जिथे ओबीसी घरे आहेत तिथे त्यांना त्रास दिला जात आहे. जिथे दोन-चार घरे आहेत, एखादे घर आहे ते गावे सोडत आहेत. उत्सव साजरा करा पण ओबीसींविरोधात उन्मादी उत्सव करणे चुकीचे आहे. मला वाटत आहे परिस्थिती चिघळत चालली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.