पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून बीआरसी (बिन रिफ्यूज कलेक्टर) प्रकारची १५ वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
सुमारे ८ कोटी २१ लाख रुपयांच्या या खरेदीसाठी स्थायी समितीने आज मान्यता दिली. असे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या मोटार वाहन विभागामार्फत या वाहनांची खरेदी केली जाणार असून, यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये मे. पगारिया ऑटो प्रा. लि. यांची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे. संबंधित संस्थेने मूळ निविदा रकमेपेक्षा १.५० टक्क्यांनी कमी दर सादर केला आहे.
त्यानुसार प्रति वाहन सुमारे ४६.४२ लाख रुपये (जीएसटी वगळून) खर्च अपेक्षित असून, १८ टक्के जीएसटीसह एका वाहनाची किंमत सुमारे ५४.७८ लाख रुपये ठरते. अशा १५ वाहनांसाठी एकूण खर्च ८ कोटी २१ लाख ७८ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.
या खरेदीसाठी अंदाजित मूळ रक्कम सुमारे ७.०७ कोटी रुपये होती. निविदा प्रक्रिया डिसेंबर २०२५ मध्ये राबविण्यात आली होती. त्यानंतर पुनर्निविदाही काढण्यात आली होती. अंतिम टप्प्यात दोन निविदादार पात्र ठरले असून, त्यापैकी पगारिया ऑटो प्रा. लि. यांची निविदा कमी दराची असल्याने त्यांची शिफारस करण्यात आली आहे.
ही खरेदी सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकातील ‘नवीन समाविष्ट गावांसाठी कचरा वाहतूक वाहने खरेदी’ या अर्थशीर्षकातून करण्यात येणार आहे. या कामासाठी काही निधी उपलब्ध असला तरी उर्वरित सुमारे ८४ लाख रुपयांची तरतूद वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शहराच्या वाढत्या हद्दीमुळे कचरा संकलन व वाहतुकीसाठी अतिरिक्त वाहनांची गरज भासत असून, या प्रस्तावामुळे व्यवस्थापनात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

