पुणे, दि. ३० : महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या कामकाजाला विशेष गती प्राप्त झाली आहे.

राज्यातील ६५० हून अधिक गोशाळांना भेटी देऊन तसेच १००० पेक्षा अधिक गोपालक, शेतकरी व संबंधित संस्थांशी संवाद साधत विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सन २०२५-२६ या वर्षासाठी देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रती गाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे.
‘सेव्ह द काऊ’ उपक्रमांतर्गत ५,५०० हून अधिक गाईंचे संरक्षण करण्यात आले आहे. तसेच सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोमयापासून तयार करण्यात येणारे दिवे, मूर्ती, साबण यांसारख्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे.
याशिवाय, गोमय उत्पादने, ई-गोकट्टा उपक्रम, अधिकृत संकेतस्थळ यांसारख्या माध्यमांतून गोसंरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून आयोगाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान करण्यात आले आहे. राज्यातील गोवंश संरक्षणासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

