पुणे- महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल दि. २८.०४.२०२६ रोजी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते व राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे प्रमुख मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे “द्वितीय सेवा हक्क दिन” या निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सोहळ्यामध्ये महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान करण्यात आला. सदर राज्यस्तरीय सोहळा सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
पुणे महानगरपालिके मार्फत अधिकाधिक गतिमान माहिती, सेवा, योजना प्रदान करण्यासाठी पीएमसी ३६० संकल्पना राबविण्यात येत आहे. या मध्ये संकेतस्थळ, सेवा पोर्टल, तक्रार निवारण, डीबीटी पोर्टल, ऑनलाईन पेमेंट, ई स्वाक्षरी (eSign), QR Code प्रमाणीकरण, Whats App BOT, आपले सरकार पोर्टल, PMC Care इंटरफेसद्वारे उपलब्ध आहेत. मागील वर्षात या सर्व प्रणाली अद्ययावत करण्यात आल्यामुळे लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करणे सुलभ व नागरिकाभिमुख झाले आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत. त्यासाठी राज्य सेवा हक्क आयुक्तांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

