उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून मुले खुश असतात. फळांच्या राजाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वचजण आतुरतेने उन्हाळ्याची वाट पाहतात. पण उन्हाचा पारा चढायला लागल्यानंतर सर्वांच्याच जीवाची काहिली होते. ऋतू बदलामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यात प्रामुख्याने उष्माघाताने होणाऱ्या आजारांचा समावेश होतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याबरोबरच खाण्यापिण्यावरही बंधने ठेवावी लागतात. उष्णतेच्या त्रासापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये याबाबत आरोग्य विभागाकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
काय करावे ?
१. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर एक तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
२. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
३. दुपारी १२ ते ४ या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
४. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
५. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
६. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
७. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
८. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
९. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
१०. अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
११. गुरांना गोठ्यात ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
१२. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
१३. पंखे. ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
१४. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
१५. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
१६. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
१७. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
काय करु नये ?
१. उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत.
२. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नयेत.
३. दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
४. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
५. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
६. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
७. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
८. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.
- संकलन: विभागीय माहिती कार्यालय, पुणे

