पुणे- चोर काय,कुठेही चोरीची सवय सोडत नाही असे म्हणायची वेळ येईल अशी घटना उघड झाली आहे. अगोदरच समाजात पोलिसांबद्दल काय भावना आहेत हे सर्व जाणून आहेतच त्यात आता पोलिसांनीच पोलिस ठाण्यातच चोरी केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पोलिसांवर जप्त केलेल्या दुचाकी चोरून परस्पर विकल्याचा आरोप आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केली असता या चोराला लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या 4 पोलिसांनीच काही दुचाकी परस्पर विक्री करण्यास सांगितल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. आरोपी पोलिसांनी या आरोपीला जप्त करण्यात आलेल्या दुचाकी स्क्रॅपमध्ये काढण्यात आल्यामुळे त्या विक्री करण्याचे सांगितले होते. त्यानुसार या आरोपीने त्या दुचाकी विक्री केल्या.आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी या आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. चौकशीत ही बाब स्पष्ट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अनेकदा या पोलिस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. पण हे कर्मचारी उपस्थित झाले नाही. अखेर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस उपायुक्तांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश जारी केले. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे व राजेश दराडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.