मुंबई-
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी यासंबंधीची घोषणा केली. त्यांनी स्वतः अशोक सराफ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.
अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. त्यांनी 1969 पासून सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 1969 मध्ये त्यांनी जानकी नावाचा चित्रपट केला. त्यानंतर त्यांनी ‘दोन्ही घरचा पाहूणा’, ‘जवळ ये लाजू नको’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘दीड शहाणे’, ‘हळदी कुंकू’ अशा अनेक चित्रपटामध्ये काम केले.
अशोक सराफ यांची मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्यासोबतची जोडी लोकांना फार आवडली. ‘बिनकामाचा नवरा’ या चित्रपटामुळे ही जोडी विशेष गाजली. तेव्हापासून अशोक सराफ यांच्या कामाचा आलेख उंचावत गेला. याच काळात त्यांना लोक मामा या नावाने ओळखू लागले. मामांची शैली म्हणजे विनोदी अभिनय. आपल्या विनोदी अभिनयाने ते सर्वाना पोट धरून हसायला लावतात. त्यांनी फक्त चित्रपटच नव्हे तर ‘ये छोटी बडी बाते’, ‘हम पांच’ अशा हिंदी मालिकांमध्येही काम केलं. या मालिकाही विनोदी धाटणीच्याच असल्या कारणाने विनोदी अभिनय हा मामांचा हातखंडाच बनला.
अशोक सराफ यांनी अनेक नाटकांमध्येही मामांनी काम केले. ‘लगीनघाई’ , ‘मनोमिलन’, ‘संगीत संशय कल्लोळ’ ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर व महेश कोठारे हे समीकरण आलटून पालटून लोकांच्या समोर यायचे. त्यातल्या त्यात मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री विशेष फुलली. तेच त्यांच्या अभिनयातही दिसून यायचे. सचिन पिळगावकर तर मामांचे लहान बंधूच बनले. या सर्वांनी मिळून केलेले चित्रपट लोकांना प्रचंड आवडले. ‘अशी हि बनवा बनावी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धूम धडाका’ असे अनेक चित्रपट त्यांनी केले. अशोक सराफ यांनी ‘करण अर्जुन’, कोयला, येस बॉस, ‘सिंघम’ आदी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. अशोक सराफ यांनी मराठी व हिंदी अशा जवळपास 250 चित्रपटांत काम केले. यामुळे मराठी सिनेसृष्टीतील ते सम्राट अशोक म्हणूनही ओळखले जातात. उल्लेखनीय बाब म्हणजे ते जुन्या पिढीच्या अभिनेत्यांसह आजच्या तरुण पिढीच्या अभिनेत्यांसोबतही सहजपणे वावरताना दिसून येतात.
चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी अशोक सराफ बँकेत काम करत होते. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचे होते, पण त्यांनी वडिलांचा शब्द पाळत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. आणि सोबतच आपला छंद जोपासत थिएटरही करू लागले.