पुणे-महापालिकेतर्फे सारसबाग येथे दुमजली फूड प्लाझा उभारण्यात येणार आहे. सध्याच्या फूड स्टॉल्सच्या जागेवरच उभारल्या जाणाऱ्या या फूड प्लाझामुळे विकास आराखड्यानुसार बनविण्यात आलेला येथील 20 मीटर रुंद रस्ता कायमस्वरूपी बंद होणार आहे.असे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले,’ त्यासाठीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असून, हा रस्ता बंद करण्यासंदर्भात एक महिन्याच्या आत हरकती सूचना मागविल्या आहेत. सारसबागेजवळ पूर्व पश्चिम 20 मीटर रुंदीचा विकास आराखड्यात मान्य (डीपी) रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला पूर्वीपासून 5 बाय 4 फूट आकाराच्या 54 खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणाला फूड झोन म्हणून मान्यता आहे. आता या रस्त्यावर नव्याने फूड झोन प्रस्तावित करण्यात आली आहे. या नव्या फूड झोनसाठी या रस्त्यावर बांधकाम केले जाणार आहे.
येथे अद्ययावत सुविधेसह फूड कोर्ट, प्लंबिंग व विद्युत विषयीचे कामे, लहान मुलांसाठी खेळणी व ज्येष्ठ नागरिक व अन्य नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत. या कामामुळे चिमाजी अप्पा पेशवे रस्ता ते पेशवे उद्यान यामधील 20 मीटर रूंद व 155 मीटर लांबीचा संपूर्ण डीपी रस्ता कायमस्वरूपी बंद होणार आहे. या 20 मीटर रूंदीच्या डीपी रस्त्यास अन्य पर्यायी रस्ते जवळच उपलब्ध आहेत. हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 203 (2) व 204 नुसार कार्यवाही केली जाणार आहे, असे पालिकेच्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने याबाबतची जाहिरात 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार हा रस्ता बंद करण्यासंदर्भात नागरिकांनी एक महिन्याच्या आत हरकती व सूचना कळवाव्यात. यानंतर आलेल्या हरकती, सूचनांची दखल घेतली जाणार नाही. असेही माधव जगताप यांनी म्हटले आहे.