गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून परीक्षेत त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी काल विद्यार्थ्यांना विविध मार्ग सुचवले. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक पंतप्रधानांच्या या संवाद कार्यक्रमातून परीक्षेला सामोरे जाताना कोणत्या गोष्टींचे पालन करायचे हे जाणून घेताना पंतप्रधानांनी पालकांच्या अपेक्षा आणि इच्छा यावरदेखील भाष्य केले. सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पाहता यावा यासाठी सर्व वर्गात स्वतंत्र प्रोजेक्टर असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचे मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी सांगितले.
अपयश मोठ्या प्रेरणा बनू शकतात, अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टी यांच्यात संतुलन राखणे, दररोज किमान एक तास तंत्रज्ञानापासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आग्रह धरताना मोदी यांनी विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबर राहण्यास सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाने आमचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचं इयत्ता नववी मधील रावी नामजोशी या विद्यार्थिनीने सांगितले. तर पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी परीक्षा हा निर्णायक घटक नसून तो एक जीवनातील महत्त्वाची पायरी असल्याचा पंतप्रधानांचा मुद्दा विशेष आवडल्याचे प्रशालेतील शिक्षिका सौ मधुरा बापट-करमरकर यांनी सांगितले.