वंचित विकास संस्थेतर्फे अभिरुची वर्ग, फुलवातील बाल कलाकारांसाठी अभिनय व नृत्य स्पर्धा
पुणे : माझ्या पप्पांनी गणपती आणला…सुनो गोर से दुनियावालो… मी हाय कोळी सोरिल्या होरी… मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून… आली दिवाळी… इतनी सी ख़ुशी… बुमरो बुमरो.. यासारख्या अभिनय गीत, देशभक्ती गीत, बालगीतावर लहानग्यांनी ठेका धरला. नृत्याच्या साथीला अभिनयाची जोड देत झालेल्या सादरीकरणांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. आत्मेश अवधूत याच्या बासरी व श्रीकांत मगर याच्या ताशा वादनाने उपस्थितांची मने जिंकली.
निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित अभिनय व नृत्य स्पर्धेचे!. वंचित विकास संचालित अभिरुची वर्ग आणि फुलवातील बालकलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने भरतनाट्य रंगमंदिरात आनंदमेळा रंगला. या अभिनय व नृत्य स्पर्धेत संस्थेच्या वेगवेगळ्या वस्त्यामधील १५ अभिरुची वर्गातील, तसेच फुलवा प्रकल्पामधील मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ४ ते १२ वयोगटातील २५० हुन अधिक मुलांनी सहभागी घेतला. या स्पर्धेसाठी अमेरिकेतील मॉरिस फॅमिलीचे फंड यांचे विशेष सहकार्य लाभले.
एकल नृत्य, समूहनृत्य, समूहगायन, वेशभूषा, भारूड, पोवाडा, बासरी व ताशावादन आदी प्रकारातील २३ कलाविष्कार सादर झाले. यामध्ये हिंदी-मराठी चित्रपट गीते, बाळगीते, भावभक्ती, देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी ताल धरला. पंचशील सेवा संघ, चैत्रबन वसाहत, चुनाभट्टी, दत्त मंदिर, शिव मंदिर, दांडेकर पूल, तावरे कॉलनी, अंबिकानगर, पद्मावती भवन, गावडे समाज मंदिर, जनता वसाहत शिवशंकर मंदिर, कांदे आळी जनता वसाहत या अभिरुची वर्गतातील, तसेच फुलवातील बालकलाकारांनी सादरीकरण केले. अंजली अत्रे, माधुरी अभ्यंकर, श्रीराम ओक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
मुलांना सॅक व खाऊवाटप करण्यात आले. संस्थेच्या संचालक मीनाताई कुर्लेकर, सुनीता जोगळेकर यांच्या मार्गदर्शनात तेजस्विनी थिटे, स्नेहल मसालिया, तृप्ती फाटक यांनी स्पर्धेचे संयोजन केले. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजिली होती. सामाजिक कार्यकर्ते योगेश गोगावले, वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
वस्ती भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित विकासतर्फे अभिरुची वर्ग चालविण्यात येतात. अभिरुची वर्गात शिकणाऱ्या मुलांना कलागुण सादर करण्यासाठी ही स्पर्धा व्यासपीठ देते. या मुलांना रंगमंदिराचा अनुभव घेता यावा, यासाठी यंदा संस्थेने ही स्पर्धा भरतनाट्य रंगमंदिरात घेतली. मुलांमधील कलागुणांचा विकास, त्यांच्यात सांघिक भावना, सकारात्मक विचार तयार होण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरते, अशी भावना सुनीता जोगळेकर यांनी व्यक्त केली.
स्पर्धेतील पारितोषिक विजेते-या अभिनय व नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून शिवमंदिर, जनता वसाहतच्या ताई पूनम लंगर यांनी बसवलेल्या ‘सुनो गोर से दुनियावालो’ सादरीकरणाला प्रथम क्रमांक , दांडेकर पूल अभिरुची वर्गातील ताई रेखा परदेशी यांनी बसवलेल्या ‘मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून’ या सादरीकरणाला द्वितीय, तर कांदेआळी, जनता वसाहत अभिरुची वर्गातील ताई स्वप्नाली कट्टी यांच्या ‘मी आहे शाम’ सादरीकरणाला तृतीय क्रमांक मिळाला. छोट्या गटातून पद्मावती भवन, अप्पर इंदिरानगर अभिरुची वर्गातील ताई सारिका उबाळे यांच्या ‘इत्ति सी ख़ुशी’ला प्रथम, गावडे समाज मंदिर जनता वसाहतच्या ताई रुपाली कदम यांच्या ‘बुमरो बुमरो’ला द्वितीय आणि शिवमंदिर, जनता वसाहत ताई पूनम लंगर यांनी बसवलेल्या ‘गल्लन गुडिया’ला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.