पुणे: राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कानामध्ये इअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाईन नोंदणी ‘भारत पशुधन पोर्टल’वर करण्यात आली आहे अशाच दुधाळ गाईसाठी शासनाचे अनुदान देय असणार आहे, त्यामुळे सर्व पशुपालकांना पशुधनाचे युनिक इअर टॅगिंग करुन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पशुपालकांचा आपल्या पशुधनाच्या कानाला १२ अंकी युनिक इअर टॅगिंग प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० जानेवारीपर्यंत १६ हजार २४६ पशुधनाची व ३ हजार ३७१ पशुपालकांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे. ‘भारत पशुधन ॲप’वर जनावरांच्या मालकी हस्तांतरणाची नोंदणी ७ हजार ६३४, नोंदीत केलेले बदल ३ हजार ६९१, पशुपालकांच्या नावात केलेले बदल ९५८ इतके कामकाज करण्यात आले आहे.
पशुधनास वेळीच टॅगींग होण्यासाठी अतिरिक्त १ लाख ४२ हजार इतका टॅगचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करून देण्यात आलेला आहे. तरी अद्यापही पशुधनाचे टॅगिंग अथवा ॲपवर नोंदणी केलेली नाही अशा पशुपालकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे