मुंबई-सकाळी कोणत्या तरी एका अधिकाऱ्याने कोणत्या तरी कागदावर माझी फसवून सही घेतल्याचा आरोप मराठा आरक्षणासाठी सरकारशी झुंज देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सकाळी एक अधिकारी माझ्याकडे आला. त्याने झोपेच्या नादातच माझी सही घेतली आणि झपाझपा निघून गेला, असे ते म्हणालेत. या सहीचा गैरवापर केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण मोर्चा गुरुवारी लोणावळ्याहून वाशीच्या दिशेने पुढे निघाला आहे. रस्त्यात नवी मुंबई पोलिसांनी त्यांना10 किलोमीटरपर्यंतचा मार्ग बदलण्याची विनंती केली. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्हाला या भागातील रस्ते माहिती नसल्यामु्ळे आम्ही सरळ रस्त्याने जाणार. आम्हाला मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेची एक बाजू उपलब्ध करून द्या, असे ते पोलिसांना म्हणाले. मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सकाळी कुणीतरी अधिकारी आला. त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचे सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो. त्यामुळे मी लगेच सही केली. त्यात एक मराठी व इंग्रजी कागद होता. सकाळी मोर्चाची गडबड असताना त्याने मी झोपेच्या नादात असताना माझी सही घेतली. माझ्यासह यात इतर 9 जण असल्याचे सांगत त्यांनी सही घेतली.
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनोज जरांगे यांना परवानगी नाकारली आहे. पण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत. आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह गुरुवारी लोणावळ्याहून वाशीकडे निघालेत. त्यांच्या रस्त्यात अनेक मोठी रुग्णालये आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती केली. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मला येथील रस्ते माहिती नाहीत. त्यामुळे ही कामगिरी आम्ही येथील स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. आता कार्यकर्ते व पोलिस सांगतील तसाच मी जाणार. आज मुक्काम वाशीला असणार आणि उद्या आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर बसणार, असे ते म्हणाले. उद्या प्रजासत्ताक दिन आहे, पण त्याचा व मोर्चाचा आम्ही कोणताही संबंध जोडणार नाही. प्रजासत्ताक दिन हा सर्वात वर आहे. त्यामुळे आम्हीही तो साजरा करणार, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.