पुणे, : पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या औचित्याने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे १७ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मिलेट महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवाद्वारे सुमारे २५ ते ३० लाखांची उलाढाल झाली.
महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारीसंस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये मिलेट उत्पादकांना ४० स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्राहि तृणधान्ये व यापासुन तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविन्यपूर्ण अशी असंख्य उत्पादने थेट उत्पादकांकडून उपलब्ध करुन देण्यात आली. याबरोबरच मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्य विषयक महत्व याविषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते संमेलन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
हा मिलेट महोत्सव देशांतर्गत व्यापार व निर्यातीसाठी ग्राहक व मिलेट उत्पादक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यापुढील काळातही कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून विभागस्तरावर व जिल्हास्तरावर अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. महोत्सवास विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, ग्राहक अशा साधारणत: ३० ते ३५ हजार व्यक्तींनी भेट देऊन मिलेटच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांची माहिती घेतली व उत्पादने खरेदी केली असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे.