मुंबई- आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही असे रोहित पवार म्हणाले. ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.आमदार रोहित पवार यांची आज केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी होणार आहे. रोहित पवार यांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले तसेच भारतीय संविधानाला अभिवादन केले त्यानंतरईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आता या चौकशीसाठी रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत.
या घटनाक्रमामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. ही चौकशी सुरू असताना स्वतः शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापासून जवळच असणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यालयात हजर राहणार आहेत.शरद पवार गटाने रोहित पवारांवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह या कारवाईविरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनात सहभागी होार आहेत. दुसरीकडे रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या कार्यालयाबाहेर रोहित पवारांच्या समर्थनार्थ ‘एकच वादा रोहित दादा’ अशी जोरदार घोषणाबाजी करत आहेत. पूर्वी ही घोषणा अजित पवारांविषयी केली जात होती. पण आता अजित पवारांच्या बंडखोरीमुळे रोहित पवारांचे पक्षातील महत्त्व वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे ईडीने काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोमध्ये धाड टाकली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर व रवींद्र वायकर यांनाही वेगवेगळ्या प्रकरणांत चौकशीच्या नोटीसा मिळाल्या आहेत.