पिंपरी, पुणे (दि. २३ जानेवारी २०२४) मुंबई येथे मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा -२०२३ स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक स्कूलच्या माध्यमिक विभागाने अंतिम फेरीत पाच वैयक्तिक बक्षीसांसह प्रथम क्रमांक पटकावला.
नवी मुंबईतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी येथे अंतिम फेरी नुकतीच पार पडली. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध विभागातून संघ दाखल झाले होते. अंतिम फेरीत हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल, माध्यमिक विभागाच्या ‘द फ्लायर्स’ टीमने ३१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळवले. तसेच वैयक्तिक पातळीवर लेखन प्रथम क्रमांक – जगदीश पवार; दिग्दर्शन प्रथम क्रमांक – जगदीश पवार; पार्श्वसंगीत प्रथम क्रमांक – मंगल साठे; स्त्री अभिनय प्रथम – सृष्टी पाटील आणि पुरुष अभिनय प्रथम क्रमांक – अविनाश बुरसे यांनीही पारितोषिके पटकावली. ‘द फ्लायर्स’ टीममध्ये आदिती झरकर, कु. सृष्टी पाटील, चि. सौम्य साबळे, चि. मानस झेंडे, चि. शार्दूल पाठक, चि. अविनाश बुरसे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
शालेय समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, शालाप्रमुख सुनील शिवले, उपशालाप्रमुख दीपा अभ्यंकर आदींनी ‘द फ्लायर्स’ च्या टीमचे अभिनंदन केले आहे.