धंगेकरांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील-लोकसभेसाठी मी इच्छुक, मला तयारीची गरज लागत नाही …
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे 500 वर्षांपासून सुरू असलेला राम मंदिराचा प्रश्न सुटला. याबरोबरच जम्मू-काश्मीर संबंधित कलम 370 हा प्रश्न देखील सुटला. याचा आनंद प्रत्येक भारतीयास असल्याचे मत भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले.
पाचशे वर्षानंतर अयोध्येत राम मंदिर उभारले आहे आणि या मंदिरात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण भारतासह जगभरात हा सोहळा पाहिला गेला. प्रत्येक हिंदुसाठी आणि भारतीयांसाठी हा आनंद उत्सव ठरला. यानिमित्ताने माजी खासदार संजय काकडे यांनी त्यांच्या कार्यालयात प्रभु श्रीराम मूर्तीची पूजा व महाआरती केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मंदिर उभारणी, प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या गोष्टींना राजकारणाशी जोडू नका. या घटना आस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. लोकसभा निवडणूक आली म्हणून राम मंदिर उभारले आणि आता प्राणप्रतिष्ठा केली नाही. लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांची यादी मोठी आहे. विकासकामांच्या जोरावरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील यात शंका वाटत नाही, असेही संजय काकडे म्हणाले.
पुणे लोकसभेसाठी मी इच्छुक, पण…मला तयारीची गरज लागत नाही
लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. आणि पुणे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षात दहा जण इच्छुक आहेत. मी देखील इच्छुक आहे. माझ्या तयारीबद्दल फार सांगण्याची आवश्यकता नाही. ते सर्वांना माहिती आहे. सर्वजणच निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत.मला तयारीची गरज लागत नाही ते तुम्हाला ठाऊक आहे , परंतु, भाजपा मध्ये वरिष्ठ पातळीवर उमेदवार ठरवले जातात. पक्षाकडून ज्याला पण उमेदवारी मिळेल त्याचे काम आम्ही सर्वजण करू आणि भाजपचा विजय निश्चित करू, असेही संजय काकडे यांनी यावेळी सांगितले.
धंगेकरांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील
कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा भाजपा मध्ये प्रवेश होणार आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आता तरी तशी काही चर्चा नाही. महापालिका व विधानसभेच्या वेळी याविषयी चर्चा झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीवेळी असा काही निर्णय होणार असेल तर तो वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो, असे संजय काकडे म्हणाले.