अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रम
मुंबई भाजपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई दिनांक २२ जानेवारी २०२४
रामभक्तीचा जागर, जागोजागी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा, श्रीरामाचा जयजयकार व आध्यात्मिक कार्यक्रम इत्यादीमुळे संपूर्ण मुंबई अक्षरशः ‘रामलल्ला’ मय झाली होती. अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मुंबई भाजपाच्या वतीने अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात शहरासह, उपनगरात विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मिठाईचे वाटप, रामनामाच्या टोप्या, सदरे , झेंडे तसेच जय श्रीरामची भगवी, केशरी आणि लाल चित्रांचे छापील आकर्षक दुपट्टे आणि मफलर गळ्यात घालून दुचाकीवरून रामध्वज, हनुमान ध्वज मिरवत रॅली काढण्यात आली. ढोल-ताशा पथकांच्या सामूहिक वादनाची यावेळी जुगलबंदी पाहायला मिळाली. शहरातील मंदिरात खास फुलांची सजावट करून विशेष पूजन, अभिषेक, महाआरती, शंखनाद प्रसादवाटप, भजन संध्या असे कार्यक्रम पार पडले.
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी खार येथील भव्य रथयात्रेत सहभाग घेतला. जोगेश्वरी येथील कार्यालयाला भेट दिली. जुहू येथील उत्सवात सहभाग घेतला. खा. गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत कांदिवलीतील महावीर नगर येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. खा. मनोज कोटक यांनी मुलुंड पश्चिम येथील देविदयाल गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. खा. पूनम महाजन यांनी विलेपार्ले येथील शोभा यात्रेत सहभाग घेतला. आ. राम कदम यांनी गोमाता दर्शन घेवून होमहवन कार्यक्रमात सहभाग घेतला. आ. पराग अळवणी यांनी विलेपार्ले कल्चर सेंटर येथे उपस्थित राहून भक्तिमय कार्यक्रमाचा आनंद लुटला. जुहू बीचवर आयोजित प्रार्थना कार्यक्रमात आ. अमित साटम यांनी उपस्थिती दर्शविली. वर्सोवा विधानसभेत आ. भारती लवेकर यांनी होमवन, महाआरती, महाभंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले. कांदिवली पूर्व विधानसभेत आ. अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत शोभायात्रा, मोटारसायकल रॅली, महाआरती असे कार्यक्रम घेण्यात आले. आ. मनीषा ताई चौधरी यांच्या उपस्थितीत दहिसर विधानसभेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बोरिवली विधानसभेत आ. सुनील राणे यांनी परिसरातील विविध मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले. प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावा याकरिता आ. प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नाने मागाठाणे येथील साईबाबा मंदिरात एलईडी स्क्रीन लावण्यात आली. मुंबई भाजपा सोशल मीडिया सेलच्या वतीने मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुंबई भाजपा विविध सेल, आघाड्यांच्या वतीने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्त स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे भारावलेले वातावरण म्हणजे स्वर्गीय अनुभूती आहे, अशा भावना मुंबईतील रामभक्तांनी यावेळी व्यक्त केली.