पुणे, दि. २१ जानेवारी २०२४ : मराठी चित्रपटक्षेत्र वलयांकीत होण्याची गरज आहे, तरच मराठी चित्रपट चालतील, असे मत अभिनेते-दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी व्यक्त केले.
२२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (‘पिफ’) ‘नव्या मराठी चित्रपटाच्या शोधात’, या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. दिग्दर्शक निखिल महाजन, लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर, अभिनेते निर्माते मंगेश देसाई, लेखक संजय कृष्णाजी पाटील यावेळी उपस्थित होते. महोत्सवाचे संचालक डॉ. ज्ब्बार पटेल यांनी त्यांना बोलते केले.
देशमुख म्हणाले, की ओटीटी मराठी चित्रपट घेत नाहीत. सॅटेलाईट वाहिन्यांवर फार किंमत मिळत नाही. त्यामुळे मराठी चित्रपटक्षेत्र हे वलयांकीत (स्टार ड्रीव्हन) झाले पाहीजे. केवळ अभिनेतेच नव्हे तर लेखक, दिग्दर्शक आणि त्यातील तंत्रज्ञ यांना वलय मिळाले पाहिजे. तरच मराठी चित्रपट चालतील. म् महाराष्ट्राची लोकसंख्या ही मोठी आहे, त्यामुळे मराठी चित्रपट चालायला हरकत नाहीत. मात्र ते तेव्हढया मोठ्या प्रमाणावर चालत नाहीत. त्यासाठी सर्व मोठ्या स्टुडिओंनी एकत्र यायला हवे आणि एकत्रीतपणे वर्षाला मोठे १२ चित्रपट निर्माण केले पाहिजेत. दर महिन्या- दीड महिन्याला मोठा चित्रपट आला, तर प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर येतील.
ते पुढे म्हणाले, “मराठी लोक हे चर्चा ऐकून पुढच्या आठवड्यात चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे गाजलेल्या चित्रपटांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या आठवड्यात होतो. याचा चित्रपट निर्मात्यांनी विचार केला पाहिजे. मराठी चित्रपटाचे प्रेक्षक ट्रेन मध्ये बसलेले आहेत. त्यामुळे दिग्दर्शक निर्मात्यांनी ट्रेनमध्ये बसले पाहिजे, स्टेशनवर राहून चालणार नाही.”
देशमुख म्हणाले की मराठीमध्ये काही भव्य आणि वेगळे करण्याचा प्रयत्न आहे. मराठी चित्रपट मोठा झाला पाहिजे. मरेपर्यंत आम्ही मराठी चित्रपटासाठी उभे राहू. त्यासाठी नव्या लोकांना सतत संधी दिली पाहिजे. नव्या चित्रपट निर्मात्यांना त्यांनी सल्ला दिला, की स्वतःची गाडी विकून, जमीन गहाण ठेऊन चित्रपट काढू नका.
निखिल महाजन म्हणाले, की मराठी सिनेमा हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पन्नाच्या बाबतीत जायला हवा. पुरस्कार महत्त्वाचे आहेत, पण पुरस्कारापेक्षा चित्रपट चालायला हवेत.
ते म्हणाले, “मराठीमध्ये ‘केजीएफ’, कंथारा’ यांसारखे चित्रपट निर्माण व्हायला हवे.”
वरुण नार्वेकर म्हणाले की अशा कथा सांगण्याची गरज आहे, की प्रेक्षकांना ज्या ओटीटी आणि छोट्या पडद्यापेक्षा चित्रपट गृहात बघायला आवडतील, तरच प्रेक्षक चित्रपट गृहाकडे वळतील.
मंगेश देसाई म्हणाले, की चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याप्रमाणे मराठी प्रेक्षकांचीही काही जबाबदारी आहे. त्यांनी प्रामाणिकपणे चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहायला हवेत.
ते म्हणाले, “सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांनी एकत्र येऊन चित्रपट प्रदर्शीत करण्याबद्दल विचार केला पाहीजे. मोठे चित्रपट केंव्हा येतात, तेंव्हा इतर चित्रपट प्रदर्शीत करणे टाळले पाहीजे.
संजय कृष्णाजी पाटील न्हाणाळे, की मराठीमध्ये साहित्याला तोटा नाही. चित्रकर्मिनी वाचले पाहीजे. ते वाचत नाहीत ही अडचण आहे. ते म्हणाले, “भविष्यामध्ये चित्रपट निर्माण करणाऱ्यांपूढे कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) आव्हान उभे राहणार आहे, याचा विचार केला पाहिजे.”
डॉ. पटेल यांनी नव्या दिग्दर्शकांना सल्ला दिला की, गाजलेल्या चित्रपटांची बीजं घेऊन चित्रपट करू नका. त्याचा फॉर्म्युला बनवू नका. आपले पारंपरीक संगीत आणि संचीत घेऊन काम केले पाहिजे आणि तांत्रीक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
आपण चित्रपट क्षेत्राकडे कसे वळलो, हे सांगताना रितेश देशमुख म्हणाले, की मी अगोदर आर्किटेक्ट झालो आणि अमेरिकेत काम करण्यासाठी गेलो होतो आणि पुढे हेच केले असते. पण मी मला स्वतःचा शोध घेण्यासाठी अमेरिकेत अभिनयाचा कोर्स केला आणि पुढे चित्रपटात आलो. “मी आणि जेनेलीया आम्ही एकत्रीतपणे ‘जोगवा’ पाहीला आणि नंतर लगेच मराठीमध्ये येण्याचा विचार केला.”
निखिल महाजन म्हणाले, “मी इंजिनिअरिंग केले आहे पण २००७ मध्ये ‘पिफ’मध्ये येऊन चित्रपट पाहीले आणि ‘पिफ’मुळे मी चित्रपटांकडे वळलो. २००७ मध्ये मि एथे आलो आणि नंतर चित्रपटाकडे वळलो.
वरुण म्हणाले, की माझ्या शाळेतील सगळे मित्र अमेरिकेत गेले. पण मला मात्र शास्त्र शाखेमध्ये जाता आले नाही त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. नाटकात काम करणारे अनेक मित्र होते, त्यामुळे पैसे कमावण्यासाठी मी अनेकांना सहाय्य करण्यासाठी हे क्षेत्र निवडले आणि पुढे चित्रपटाकडे वळलो.
संजय पाटील म्हणाले, “मी सिव्हिल इंजिनिअरिंग केले, साहीत्यामध्ये डिग्री गेली. पण चित्रपटाची आवड होतीच, त्यातून मी पुढे चित्रपटात आलो.” ते म्हणाले, ते कोल्हापूरमध्ये चित्रपटाचे ब्लॅक करीत होते. चारुता सागर यांची ‘दर्शन’ कथा वाचली आणि लेखन करायचा विचार केला आणि पुढे जोगवा चित्रपट आला. सिनेमा नसेल, तर जगण्याला अर्थ नाही.”
मंगेश देसाई म्हणाले, “माझ्या वडिलांची इच्छा होती, की डॉक्टर व्हावे पण कमी मार्क मिळाल्याने ते शक्य झाले नाही. मी अभिनय करीत होतोच. पुरुषोत्तममध्ये एकदा अभिनयाचे पारितोषिक मिळाले, नाट्यदर्पणमध्ये पारितोषिक मिळाले. राजीव पाटील यांनी संधी दिली आणि २००४ मध्ये चित्रपटाकडे वळलो.”