पुणे : बालकांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने आणि लहान मुले त्यांचे पालक आणि शिक्षक यांना कायद्याची माहिती व्हावी, या उद्देशाने बाल ‘रक्षक’ कायद्याचे अंतरंग पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. मुलांना कायद्याची सुरक्षितता आणि संरक्षण मिळावे आणि कायद्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने अॅड. प्रताप परदेशी लिखित बाल ‘रक्षक’ कायद्याचे अंतरंग पुस्तकाचे प्रकाशन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालय येथे पोस्को न्यायालयाच्या कोनशिला अनावरण प्रसंगी पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती ए.एस.डॉक्टर, जिल्हा न्यायाधीश के.पी. नांदेडकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. केतन कोठावळे, पुस्तकाचे लेखक अॅड. प्रताप परदेशी, डॉ. अविनाश भोंडवे, पीएमआरडीएचे राहूल महिवाल,अॅड. राजेंद्र उमाप उपस्थित होते.
के.पी. नांदेडकर म्हणाले, पुस्तकाला जेव्हा प्रकाशनासाठी विभागाकडे पाठवले होते, त्यावेळी त्यांचा पुस्तकाविषयी अभिप्राय आला, अतिशय सोप्या भाषेतील मुलांना कायदेशीर बाबी सांगणारे हे पुस्तक आहे. मुलांना आवश्यक असणारी कायद्याची माहिती अतिशय साध्या सरळ भाषेत पुस्तकात लिहिली आहे. या पुस्तकाची निर्मिती केल्याबद्दल लेखकांचे कौतुक आहे.
प्रताप परदेशी म्हणाले, बाल ‘रक्षक’ कायद्याचे अंतरंग पुस्तक सर्व प्रकारच्या लोकांना समजेल असे आहे. साध्या सोप्या भाषेत विशेषतः लहान मुलांना शाळेत असताना कायदा कळेल असा विचार करून पुस्तकात माहिती देण्यात आली आहे.