श्री खोडलधाम ट्रस्ट-कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनीचित्रफित संदेशाद्वारे संबोधित केले.
खोडल धामच्या पवित्र भूमीशी आणि खोडल मातेच्या भक्तांशी जोडले जाणे, हा आपला बहुमान असल्याची भावना, पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. श्री खोडलधाम ट्रस्टने अमरेली इथे कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पायाभरणी करून लोक कल्याण आणि सेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवाड आपल्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण करणार असल्याचे नमूद करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
लेवा पाटीदार समाजाने 14 वर्षांपूर्वी, सेवा, मूल्ये आणि समर्पणाच्या संकल्पासह श्री खोडलधाम ट्रस्टची स्थापना केली अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. तेव्हापासून ट्रस्टने आपल्या सेवेद्वारे लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचे काम केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “शिक्षण, कृषी किंवा आरोग्य क्षेत्र असो, या ट्रस्टने सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे”, असे सांगत, अमरेली इथे उभारण्यात येणारे कर्करोग रुग्णालय, सेवाभावाचे आणखी एक उदाहरण ठरेल आणि अमरेलीसह सौराष्ट्रातील मोठ्या क्षेत्राला त्याचा फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार करणे, हे कोणत्याही व्यक्तीसाठी आणि कुटुंबासाठी मोठे आव्हान ठरते असे नमूद करून पंतप्रधान आवर्जून म्हणाले की, कर्करोगाच्या उपचारात कोणत्याही रुग्णाला अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हाच धागा पकडत पंतप्रधान पुढे म्हणाले की गेल्या 9 वर्षांत देशात सुमारे 30 नवीन कर्करोग रुग्णालये विकसित करण्यात आली आहेत आणि 10 नवीन कर्करोग रुग्णालयांवर काम सुरू आहे.
कर्करोगावरील उपचारासाठी त्याचे योग्य वेळी निदान होणे महत्त्वाचे आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. खेड्यापाड्यातील लोकांमध्ये निदान होईस्तोवर कर्करोग पसरायला सुरुवातही झालेली असते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशी वेळ येऊ नये म्हणून, केंद्र सरकारने गावपातळीवर दीड लाखाहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधली आहेत, जिथे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचे लवकरात लवकर निदान करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “कर्करोगाचे निदान लवकर झाले तर, त्यावर उपचार करण्यात डॉक्टरांनाही खूप मदत होते”, असे त्यांनी पुढे सांगितले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग किंवा स्तनाचा कर्करोग यांसारख्या आजारांचे प्राथमिक निदान करण्यात आयुष्मान आरोग्य मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असा उल्लेख करत मोदी म्हणाले की, यामुळे केंद्र सरकारच्या या प्रयत्नांचा महिलांनाही खूप फायदा झाला आहे.
गुजरातने गेल्या 20 वर्षांत आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून ते भारताचे एक मोठे वैद्यकीय केंद्र बनले आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 2002 पर्यंत गुजरातमध्ये केवळ 11 वैद्यकीय महाविद्यालये होती, तर आज ती संख्या 40 झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, गेल्या 20 वर्षांत येथील एमबीबीएसच्या जागांची संख्या जवळपास 5 पटीने वाढली आहे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांची संख्याही तिप्पट झाली आहे. “आता आपल्याकडे राजकोटमध्ये देखील एम्स या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आहेत”, असे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये 2002 पर्यंत केवळ 13 औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) महाविद्यालये होती, परंतु आज त्यांची संख्या 100च्या आसपास पोहोचली आहे आणि गेल्या 20 वर्षांत पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या फार्मसी महाविद्यालयांची संख्या 6 वरून 30 पर्यंत वाढली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
गुजरातने गावोगावी सामुदायिक आरोग्य केंद्रे सुरू करून आरोग्य क्षेत्रात मोठ्या सुधारणांचे प्रारूप सादर केले आहे आणि या माध्यमातून आदिवासी आणि गरीब भागात आरोग्य सुविधांचा विस्तार केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले.की “गुजरातमध्ये 108 रुग्णवाहिकांच्या सुविधेबाबत लोकांचा विश्वास सातत्याने दृढ होत आहे”,
कोणत्याही देशाच्या विकासासाठी निरोगी आणि सशक्त समुदायाच्या गरजेवर मोदी यांनी भर दिला. “खोडल मातेच्या आशीर्वादाने आमचे सरकार आज या विचारसरणीनुसार वाटचाल करत आहे“ असे त्यांनी सांगितले. आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख करत या योजनेमुळे आज 6 कोटींहून अधिक लोकांवर उपचार करण्यात मदत झाली असून यामध्ये कर्करुग्णांची संख्या जास्त असून योजनेमुळे त्यांचे एक लाख कोटी रुपये वाचवण्यास मदत झाली आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. 10,000 जन औषधी केंद्रे सुरु करण्याबाबत सांगतानाच याद्वारे 80 टक्के सवलतीत औषधे उपलब्ध केली जातात असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान जनऔषधी केंद्रांची संख्या 25,000 करण्याबाबतही पंतप्रधानांनी माहिती दिली. रुग्णांचे 30,000 कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचल्याचे त्यांनी नमूद केले. “सरकारने कर्करोगाच्या औषधांच्या किमतींवरही नियंत्रण ठेवल्याने अनेक कर्करुग्णांना याचा फायदा झाला आहे”, असे ते पुढे म्हणाले.
या ट्रस्टसोबतचे आपले दीर्घकालीन संबंध अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी 9 आवाहने केली आहेत. सर्वप्रथम पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे आणि जल संवर्धनाबाबत जनजागृती करणे. दुसरे – गाव स्तरावर डिजिटल व्यवहारांबाबत जनजागृती करणे. तिसरे – स्वच्छतेत आपले गाव, परिसर, शहर स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी कार्यरत राहणे. चौथे – स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि मेड इन इंडिया उत्पादनांचा शक्य तितक्या प्रमाणात वापर करणे. पाचवे – देशांतर्गत प्रवास करणे आणि देशातील पर्यटनाला चालना देणे. सहावे – नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे. सातवे – रोजच्या आहारात श्री-अन्नचा समावेश करणे. आठवे – तंदुरुस्ती, योगासने किंवा खेळाना जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे आणि शेवटी – कोणत्याही प्रकारची व्यसने आणि अंमली पदार्थांपासून दूर राहणे.
हा ट्रस्ट पूर्ण निष्ठेने आणि क्षमतेने आपली जबाबदारी पार पाडत राहील आणि अमरेली इथे बांधले जाणारे कर्करोग रुग्णालय सकल समाजाच्या कल्याणासाठी एक उदाहरण बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी लेवा पाटीदार समाज आणि श्री खोडलधाम ट्रस्टला शुभेच्छा दिल्या. “खोडल मातेच्या कृपेने तुम्ही समाजसेवेत सतत कार्यरत राहावे”, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी उच्चभ्रू वर्गाला विवाह सोहळे देशातच साजरे करण्याचे आणि परदेशी गंतव्यस्थान विवाह सोहळे साजरे करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. “मेड इन इंडियाच्या धर्तीवर आता, वेड इन इंडिया”, असे म्हणत पंतप्रधानांनी संबोधनाचा समारोप केला
***