सुरक्षा रक्षकांनी जमावापासून वाचवत बसमध्ये नेले
इटानगर-काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींसोबत धक्काबुक्की झाली. राहुल गांधींना वाचवत त्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना परत बसमध्ये नेले. घटनेच्या वेळी राहुल यांचा ताफा सोनितपूरमध्ये होता.या घटनेबाबत राहुल म्हणाले – आज भाजपचे काही कार्यकर्ते आमच्या बससमोर झेंडा घेऊन आले. मी बसमधून उतरलो आणि ते पळून गेले. तुम्हाला पाहिजे तितकी आमची पोस्टर्स फाडून टाका. आम्हाला पर्वा नाही. हा आमच्या विचारधारेचा लढा आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही. ना नरेंद्र मोदींना, ना आसामच्या मुख्यमंत्र्यांना.
न्याय यात्रेच्या ताफ्यावर 48 तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर लिहिले – आज जेव्हा आमचा ताफा आसाममधील रॅलीच्या ठिकाणी जात होता. त्यानंतर जुमगुरिहाटमध्ये हिमंता बिस्वा सरमांच्या गुंडांनी महासचिव जयराम रमेश यांच्या गाडीवर पाणी फेकले आणि स्टिकर फाडले.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी लिहिले- भाजपच्या लोकांनी कॅमेरामन आणि आमच्या सोशल मीडिया टीममधील दोन महिलांसह इतर सदस्यांवर हल्ला केला. हिमंता, ही कृत्ये करणे सोडून द्या. तुम्ही आणि तुमचे गुंड राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा रोखू शकत नाहीत.
यापूर्वी 19 जानेवारीच्या रात्रीही न्याय यात्रेच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसने भाजपवर केला होता. काँग्रेसने एक व्हिडीओही जारी केला होता, ज्यामध्ये काही वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या होत्या. तसेच काही लोक पक्षाचे होर्डिंग आणि बॅनर उखडून टाकताना दिसले.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आठव्या दिवशी अरुणाचल प्रदेशातून आसाममध्ये परतली. बिस्वनाथ जिल्ह्यात जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचे वर्णन केले.
राहुल म्हणाले- आसाम सरकार लोकांना यात्रेत सामील होऊ देत नाही. ते आम्हाला दडपून टाकतील, असे सरकारला वाटते. पण हा राहुल गांधींची यात्रा नसून जनतेची यात्रा आहे हे त्यांना माहीत नाही. तुम्हाला ना राहुल गांधी, ना इथली जनता घाबरत आहे. तुम्हाला जे पाहिजे ते करा.
दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांना 22 जानेवारीला (अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी) नागाव जिल्ह्यातील श्री शंकरदेव यांचे जन्मस्थान असलेल्या बोर्डोवा सत्राला भेट न देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले- यामुळे देशात आसामची चुकीची प्रतिमा निर्माण होईल.
ते म्हणाले- श्रीमंत शंकरदेव हे आसामी समाज-धार्मिक सुधारक आहेत. ते 15-16व्या शतकातील आसामच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील कवी, नाटककार आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत. पण त्यांची भगवान रामाशी केलेली तुलना चुकीची आहे.
19 जानेवारीच्या रात्री यात्रेवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना आसामचे मुख्यमंत्री म्हणाले – मी राहुल यांना आवाहन करतो की 22 जानेवारीला मोरीगाव, जागीरोड आणि नीली या अल्पसंख्याक बहुल भागात जाऊ नका, कारण येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. मात्र, राज्य सरकारने या भागात कमांडो तैनात केले आहेत.