बारामती, दि. २१ : बारामती शहराच्या वैभवात भर पडेल असे आराखडे तयार करा; यासाठी वारंवार तज्ज्ञांच्या सल्ला घ्या. परिसराला शोभेल असे काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामती परिसरातील नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता कन्हेरी वन विभाग, जवाहर बाग, गरुड बाग, आणि नटराज मंदीर, दशक्रिया घाट, भिगवण रस्ता परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन अधिकाऱ्यांकडून कामांबाबत माहिती घेतली.
यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते.
कन्हेरी वनविभाग परिसरातील विकास कामे करीत असताना कमी प्रमाणात पानगळ होणारी, सरळ वाढणारी, अधिकाधिक सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा. वाळवी नष्ट करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. मातीचे परीक्षण केल्यानंतरच त्याचा वापर करावा.
लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने तसेच चढतांना-उतरतांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दशक्रिया घाट येथील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करा. परिसरात सावली देणाऱ्या वृक्षाची लागवड करा. दशक्रिया घाट परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. बाबुजीनाईक वाडाच्या भिंतीच्या समान अंतरावर वृक्षारोपण करावे. कऱ्हानदी सुशोभिकरणाअंतर्गत घाट परिसरात सुरु असलेली कामे जलद गतीने पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले.
जवाहर बाग येथील कॅनालच्या समांतर सुरू असलेली पदपथाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. गरुड बागची विकासकामे करतांना कॅनालच्या कडेला व्यवस्थितपणे पाण्याचा निचरा होईल, याची दक्षता घ्यावी. नटराज मंदिराच्या परिसरात लावण्यात येणारे घड्याळ नागरिकांना ठळकपणे दिसेल असे लावा. शहरातील भिगवण रस्त्यावर अंतिम केल्याप्रमाणे पथदिवे लावावे. तालुका क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी.
नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. नागरिकांना त्रास होणार नाही, असे वाहतुकीचे नियोजन करा. परिसर सुशोभिकरणाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करुन दर्जेदार, टिकाऊ कामे करा. विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी योग्य पद्धतीने नियोजन करुन वेळेत खर्च करा. उत्तम काम करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील पावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर आदी यावेळी उपस्थित होते.