महाराष्ट्रात काँग्रेस व मविआला चांगले वातावरण, जास्तीत जास्त जागा जिंकू : रमेश चेन्नीथला
जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, लोकसभा निवडणूक एकजूटीने लढू
देशातील सामाजिक सद्भाव कायम राहण्यासाठी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा.
गडचिरोली:
देशासमोर धर्मांधशक्तींचे मोठे आव्हान असून आगामी निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. जाती-धर्मात भांडणे लावण्याचे काम या मनुवादी शक्ती करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. आगामी निवडणुका देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाच्या असून सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवू, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने विभागीय आढावा बैठका सुरु आहेत. आज पूर्व विदर्भाची आढावा बैठक गडचिरोली येथे पार पाडली. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुका देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत, देश तोडणाऱ्या शक्तींच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. देशातील शांतता, सद्भाव, शांती राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपा रामाच्या नावावर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे आरक्षणावरून समाजा-समाजात भांडणे लावत आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, सामाजिक सद्भाव यासारखे मुद्दे महत्वाचे असून निवडणुकीत या मुद्द्यांवरही काँग्रेस पक्ष भर देईल. जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक झाली असून दुसरी बैठक लवकरच होईल व त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय होईल.
लोणावळ्यात काँग्रेसचे महत्वाचे शिबिर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे शिबीर लोणावळा येथे १७ व १८ फेब्रुवारीला आयोजित केले असून या शिबाराचे उद्घाटन खासदार राहुल गांधी ऑनलाईन करतील व समारोप राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत. या शिबिराला राज्यातील ३०० महत्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस व मविआसाठी राज्यात चांगले वातावरण..
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने तोडफोड करुन सरकार बनवले पण जनतेने निवडणुकीत भाजपाचा पराभव करत पुन्हा काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले. महाराष्ट्रातही ईडी, सीबीआयचा गैरवापर करून पक्षांची फोडाफोड करून सरकार बनवले आहे. आगामी निवडणुकीत जनता भाजपाला कर्नाटकाप्रमाणेच त्यांची जागा दाखवून देईल. महाराष्ट्रात काँग्रेस व महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून जास्तीत जास्ता जागांवर काँग्रेस व महाविकास आघाडी विजयी होईल असे चेन्नीथला म्हणाले.
या आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व CWC सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, रणजित कांबळे, अनिस अहमद, सतिश चतुर्वेदी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आशिष दुआ, रामकिशन ओझा आमदार सुभाष धोटे, आ. प्रतिभाताई धानोरकर, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजा तिडके यांच्यासह पूर्व विदर्भातील काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.