पुणे, दि. २०: महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरिता गोखले इन्स्टिट्यूटकडील प्रवीण प्रशिक्षकांमार्फत (मास्टर ट्रेनर) तालुका प्रशिक्षक तसेच जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील समन्वय (नोडल) अधिकारी आणि सहायक नोडल अधिकारी यांना आज प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर महानगरपालिकास्तरीय प्रशिक्षण महानगरपालिका स्तरावर देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशिक्षणाला उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते. मास्टर ट्रेनर अश्विनी सोनटक्के यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी ११२ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातुन ३०० प्रगणकांमागे १ प्रशिक्षक, ३०० ते ६०० साठी २ प्रशिक्षक तर
६०० पेक्षा जास्त प्रगणकांसाठी ३ प्रशिक्षक असे तालुका प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले तालुकास्तरीय प्रशिक्षक तालुक्यासाठी नियुक्त पर्यवेक्षक (सुपरवायजर) व प्रगणकांना (एन्युमरेटर्स) २१ आणि २२ जानेवारी रोजी
तालुक्याच्या
ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत.
गोखले इन्स्टिट्यूटकडील मास्टर ट्रेनर तालुकास्तरीय प्रशिक्षणास मदत करतील तसेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यत संबंधीत जिल्ह्याच्या मुख्यालयात उपस्थित राहतील.
तालुकास्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये प्रत्येकी ७५ प्रगणक व त्यांचे सुपरवायझर बोलावून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या वेळी आयोगाकडून प्रगणकांसाठी ओळखपत्रे पुरविण्यात आलेली आहेत. सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर १५ नोडल अधिकारी, १५ सहायक नोडल अधिकारी, ४६६ पर्यवेक्षक व ६ हजार ५९६ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.