रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी बारामती अॅग्रो कंपनीवर छापा टाकून ईडीकडून तपासदेखील करण्यात आला होता. मुळ किमतीपेक्षा कमी किमतीत लिलाव केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. मात्र आता थेट रोहित पवारांना समन्स बजावण्यात आला असून त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. यापूर्वी मनी लॉन्ड्रींगचे कारण देत अंमलबजावणी संचालयानलायने बारामती अॅग्रो कंपनीवर शुक्रवार 5 जानेवारी रोजी छापेमारी केली. कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद केले. पुणे, बारामती आणि इतर 6 ठिकाणी ही कारवाई झाली होती. रोहित पवार यांचे काका अजित पवार यांनी बंड केले. ते महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर झालेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, रोहित पवार यांना गेल्यावर्षी सुद्धा बारामती ॲग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नोटीस मिळाली होती.
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. 2001 ते 2011 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेने तारण न घेता कर्जे दिली होती. ही कर्जे एनपीए (अनुत्पादक) मध्ये गेली. त्यानंतर ते कारखाने नेत्यांनी विकत घेतले. त्यासाठी पुन्हा शिखर बँकेनेच कर्जे दिली. यामध्ये बँकेला एकूण 2 हजार 61 कोटी रुपयांचा फटका बसला होता. अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. याच बँकेकडून बारामती ॲग्रोने बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. खरं तर 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी अजित पवारांना अटक केली होती. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्यात इतर 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.परंतु मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता.
बारामती ॲग्रो कारखान्याचा गळीत हंगाम सरकारने निश्चित केलेल्या वेळेच्या अगोदर सुरू करण्यात आला होता. या प्रकरणी विधान परिषदेचे भाजप आमदार राम शिंदे यांनी ऑक्टोबर महिन्यात तक्रार केली होती. विशेष म्हणजे विधान परिषदेमध्ये देखील लक्षवेधी क्रमांक 7 च्या अनुशंगाने त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील बारामती ॲग्रो कारखान्याच्या संचालकांविरुद्ध वेळेअगोदर उसाचा गळीत हंगाम सुरू केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक (साखर) यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.