1 हजार 300 रुपये किंमत असणारी बॉडीबॅग 6800 रुपयाला विकत घेतले.
मुंबई-शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बँग घोटाळ्याप्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांना येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावला असून लगेच त्या पाठोपाठ किशोरी पेडणेकर यांनाही समन्स बजावण्यात आला आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी देखील तपास केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिस तपास सुरु असतानाच ईडीनेदेखील या प्रकरणाची दखल घेत समांतर तपासाला सुरुवात केली. ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर यांना याआधीही समन्स बजावण्यात आले. त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीने समन्स बजावलं आहे.
कोरोना काळात डेड बॉडी किट बॅग हे अवाजवी दरात विकत घेतले, असा आरोप करण्यात आला आहे. 1 हजार 300 रुपये किंमत असणारी बॉडीबॅग 6800 रुपयाला विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत इन्फो लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे..
किशोरी पेडणेकर यांच्यावर खिचडी कथित याप्रकरणी गंभीर आरोप आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी. वेलरासू यांना देखील ईडीने समन्स बजावले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेत विविध घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यातही तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. तसेच ईडीने देखील किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.