पुणे-निवृत्त मेकॅनिकल इंजिनिअरची सायबर चोरट्यांनी ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने तब्बल 3 कोटी 95 लाख 95 हजारांचा ऑनलाईन गंडा घालत आर्थिक फसवणुककेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी संतोष जनार्दन तिवारी (वय-५९) यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २/१०/२०२३ ते ९/१२/२०२३ यादरम्यान ऑनलाइन स्वरुपात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तिवारी यांना सुरुवातीला त्यांचे फेसबुक खाते पाहताना, ट्रेडिंग संर्दभात एक जाहिरात दिसली. त्यात सांगण्यात आले की, इन्स्टीटयुशन अकाऊंट असल्याने अप्पर सर्किट असलेले शेअरर्स आम्ही आदल्या दिवशीच घेवून ठेवत असल्याने, ते खरेदी करुन खुप जास्त लाेकांना चांगला परतावा मिळाला असल्याचे जाहिरातीत सांगण्यात आले. त्याखाली एक व्हाॅटसअप लिंक देण्यात अाली हाेती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सदर लिंकवर क्लिक केल्यावर ते व्हीआयपी 13 या ग्रुपवर जाेडले गेले. या ग्रुप मध्ये ३० सदस्य हाेते व टयुटर व असिस्टंट होता. टयुटर व असिस्टंट हे दाेघेपण काेणते शेअर खरेदी व विक्री करायचे याबाबत मार्गदर्शन करुन त्याचे स्क्रीनशाॅट ग्रुपवर पाठवत हाेते.
या ग्रुपवर कशापध्दतीने ट्रेडिंग चालते याचे तक्रारदार यांनी एक अाठवडा निरीक्षण केले. त्यानंतर ग्रुपचा असिस्टंट याने त्यांना ‘स्टाॅर्क अॅप’ हे डाऊनलाेड करण्यास सांगून त्याची लिंक पाठवली. ते डाऊनलाेड केल्यावर सदर अॅप मध्ये रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात अाले. त्यावर व्यैक्तिक व बँक खात्याची माहिती भरल्यानंतर ती शेअर करण्यास सांगण्यात अाले. त्यावेळी सांगण्यात अाले की, तुम्ही जितके रकमेचे शेअर्स खरेदी कराल त्याचे पाच पटीने फायदा मिळवता येताे. त्यानुसार ग्रुप असिस्टंट झनी अझीम हा तक्रारदार यांना शेअर्स खरेदी विक्री बाबत मार्गदर्शन करत हाेता. त्यात दहा लाख रुपयांचे शेअर खरेदी करण्याबाबतची मर्यादा हाेती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दहा लाखांचे शेअर्स सुरुवातीला खरेदी केले. त्यानंतर अॅपवर तब्बल पावणेदाेन काेटी मिळाल्याचे दर्शवणात आले. मात्र, आरोपींनी सदर रक्कम काढण्यापूर्वी ती सेबीने अडकून ठेवल्याचे कारण देत आणखी पैसे भरण्यास वेगवेगळी कारणे सांगत एकूण तीन काेटी ९५ लाखांचा गंडा घातला अाहे. याबाबत पुढील तपास सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पाेलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील करत आहेत.