पुणे-बांधकामांवरील मजुरांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असूनही याबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे ,कोथरूड येथे १३ तारखेला एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला, आणि तपास करून १७ तारखेला खुद्द सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करूनहि बिल्डर , बांधकाम परवाना आणि आरोपींची नावे याबाबत पोलीस माहिती देऊ शकले नव्हते .
कोथरूड मधील शिवतीर्थनगर मधील तिरुपती अपार्टमेंटच्या बांधकाम साईटवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी १०.५० च्या सुमारास घडली.या बांधकामावर काम करत असताना तीस फुटांवरून पार्किंग डक्टमध्ये पडल्याने रघुनाथ रामा आडे (वय ४४ वर्षे रा. सहयोगनगर वारजे माळवाडी पुणे) या मजुराचा मृत्यू झाला आहे. अवेर अर्बन रियालिटी असे बांधकाम करत असलेल्या कंपनीचे नाव असल्याचे समजते . ज्ञानेश्वर रघुनाथ आडे यांनी फिर्याद दिली असे पहिल्या दिवशी सांगण्यात येत होते परंतु आज मात्र सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार आडगळे यांनी फिर्याद नोंदविल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली . मात्र बिल्डर कोण आहे ,बांधकाम परवाना होता काय , आरोपींची नवे काय आहेत हे विचारता आपण प्रशिक्षण केंद्रावर आहोत, याबाबत काही माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली .
दिनांक १३/०१/२०२४ रोजी सकाळी १०/५० वा. तिरूपती अपार्टमेंट, किष्किंदानगर, कोथरूड, पुणे येथे घडलेल्या या दुर्घटने बाबत कोथरूड पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत रजि. नं.०९/२०२४, सीआरपीसी १७४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. आणि तपासाचे चौकशीअंती कागदपत्राचे अवलोकन करता, यातील लेबर कॉन्ट्रॅक्टर व दोन सेंट्रींग इसमांनी आपसात संगनमत करून, त्यांचे दिनांक १३/०१/२०२४ रोजी तिरूपती अपार्टमेंट, सर्व्हे नं.१२०, किष्किंदानगर, कोथरूड, पुणे याठिकाणी बांधकाम चालु असलेल्या साईटवरील, मजुर कामगारां कडुन काम करवुन घेत असताना, कामगारांचे जिवीताचे व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन त्यांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट इत्यादी योग्य ती साधन सामुग्री पुरविणे आवश्यक असताना, त्यांना तशी कोणतीही सुरक्षित साधने न पुरविता, तसेच उघडया डक्टवर योग्य ती साधन ठेवण्याची सोय न करता, हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे, यातील बिगारी कामगार रघुनाथ रामा आडे, वय ४४ वर्षे, रा. पाण्याच्या टाकी जवळ, सहयोग नगर, वारजे, पुणे )हा इमारतीचे पहिल्या मजल्यावर काम करत असताना, तो पहील्या मजल्या वरील स्लॅबच्या डक्ट मधुन खाली पार्कीग मध्ये पडुन, त्याचे डोक्यास गंभीर दुखापत होवुन, तो मयत झाला. असे म्हटले आहे. सहा. पोलीस निरीक्षक, राजकुमार आडगळे ९५९४९०१४१८ हे तपास करत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद चिकणे यांनी येथील माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, सकाळी सूमारे १०.३० वा अचानक प्रचंड आरडाओरडा कानावर पडला. नेहमीप्रमाणे बघ्यांची गर्दी जमली होती. समोर पाहिले कामगार काम करत असताना अंदाजे ३० फूट उंचावरून पडल्याने पार्किंग डक्ट मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कामगारांच्या मदतीने रस्सीने त्याला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढले. अंबूलन्स यायला वेळ होईल म्हणून वेळ न घालवता मी त्याला त्वरीत उचलून २ कामगार बरोबर घेउन स्थानिक नागरीकाच्या रिक्षात घालून पौड रस्त्यावरील सह्याद्री होस्पीटल मध्ये आणले. कामगाराला प्रचंड इजा झाली असल्याने रक्त प्रवाह ही खूप झाला होता. डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. दूर्दैवाने कामगार बंधूचा जीव वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ वाटत असल्याचे त्यांनी सांगितले