गायक श्रीधर फडके आणि सहका-यांचे सादरीकरण ; अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडी व पायाभूत सुविधा आघाडीतर्फे गीत रामायण कार्यक्रम
पुणे : स्वये श्री राम प्रभु ऐकती… दशरथा घे हे पायसदान… राम जन्मला गं सखी… ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा…अशा एकाहून एक सरस रचना ऐकताना गीतरामायणातील रामकथेत पुणेकर समरस झाले. ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायणातील अजरामर गीतांनी संपूर्ण रामायण प्रत्यक्ष समोर घडत असल्याचा अनुभव रसिकांनी घेतला.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडी व पायाभूत सुविधा आघाडीतर्फे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड मधील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आघाडी अध्यक्ष अमृता देवगावकर, पायाभूत सुविधा अध्यक्ष मंदार देवगावकर, उद्योग आघाडी प्रदेश युवा अध्यक्ष मंगेश केंद्रे, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष संदीप बुटाला, सुमित्रा माडगूळकर पीएनजी चे विवेक जोशी, बेलाराईज इंडस्ट्रीजच्या सुप्रिया बडवे, पेठकर असोसिएटचे जितेंद्र पेठकर, रावेतकर बिल्डर्सचे अमोल रावेतकर, श्री वल्लभ केटरर्स चे गजानन पाध्ये यावेळी उपस्थित होते.
ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आठवणी व गीतरामायणातील प्रत्येक गीत कशाप्रकारे तयार झाले, याची प्रक्रिया गायक श्रीधर फडके यांनी रसिकांना उलगडून दाखविली. श्रीधर फडके यांनी आपल्या कसदार गायकीने प्रत्येक गीतामधून रामायणातील प्रसंगांचे सचित्र वर्णन रसिकांसमोर उभे केले.
स्वयंवर झाले सीतेचे… जय गंगे जय भागिरथी… या गीतांमध्ये रसिकांनी सहभाग घेत ठेका धरला. माणसाच्या आयुष्याचे सार सांगणारे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा… या गीताने रसिक अंतर्मुख झाले. सेतू बांधा रे… या गीतातून रसिकांनी देखील सीयावर रामचंद्र की जय असा जयघोष केला. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गार्गी कुलकर्णी यांनी निवेदन केले.