पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : अरहम रेदासानी, युतिका चव्हाण यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून दुहेरी मुकुट मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, कॉर्पोरेट ॲथलिटसचे संस्थापक अभिजीत चांदगुडे, पीवायसीचे सचिव सारंग लागू, तन्मय आगाशे यांच्या उपस्थितीत झाले. शरयू रांजणे आणि सोयरा शेलार या यंदाच्या स्कॉलरशिपच्या मानकरी ठरल्या.
अरहमने १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने एकेरीच्या अंतिम फेरीत अभिक वर्मावर २१-१९, २१-१९ अशी मात केली. यानंतर १५ वर्षांखालील गटाच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत अरहमने आर्या कुलकर्णी सह खेळताना सौरीश काणे-शर्वरी सुरवसे या जोडीवर २१-६, २१-४ अशी सहज मात करून दुहेरी यश मिळवले. अरहमला तिहेरी मुकुट मिळवण्याची संधी काही साधता आली नाही. कारण, त्याला १५ वर्षांखालील गटात मुलांच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. अभिक वर्मा – स्वरित सातपुते जोडीने अरहम-तनिष्क आडे जोडीवर २१-१५, २१-१६ अशी मात केली.
युतिकाने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे आणि १९ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. एकेरीच्या अंतिम फेरीत तिने सफा शेखवर २१-१२, २१-९ असा सहज विजय मिळवला. यानंतर १९ वर्षांखालील गटाच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत युतिकाने कृष्णा जसूजाच्या साथीने खेळताना आद्य पारसनीस – आरती चौगुले जोडीवर ९-२१, २१-१६, २२-२० असा रोमहर्षक विजय मिळवला.
पुरुष एकेरीत रिषभ देशपांडेने बाजी मारली. त्याने पहिली गेम गमावल्यानंतरही यशस्वी पुनरागमन केले. अंतिम लढतीत रिषभने वसीम शेखवर ८-२१, २१-१४, २१-१६ असा विजय मिळवला.
दिविशा, हिमांश विजेते
स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत दिविशा सिंहने वल्लारी वाटाणेवर २१-१७, २१-१६ अशी मात करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात हिमांश हरगुनानीने जेतेपद निश्चित केले. अंतिम फेरीत हिमांशने आरुष सप्रेवर २१-१६, २१-१४ असा विजय मिळवला.
ख्याती, सोमजी विजेते
स्पर्धेतील १३ वर्षांखालील गटात मुलांमध्ये रझा सोमजीने, तर मुलींमध्ये ख्याती कत्रेने जेतेपद पटकावले. मुलांच्या अंतिम फेरी सोमजीने हृदान पाडवेवर २०-२२, २१-१६, २१-१७ असा, तर ख्यातीने आराध्या ढेरेवर २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला.
अंतिम फेरीचे निकाल –
१७ वर्षांखालील मुले दुहेरी – अर्जुन देशपांडे – अवधूत कदम वि. वि. आदित्य पाटील – चैतन्य परांडेकर २१-१४, २१-९.
महिला दुहेरी – अदिती काळे – अस्मिता शेडगे वि. वि. आरती चौगले – योगिता साळवे १९-२१ २१-१७, २१-१६.
पुरुष दुहेरी – हकिमोद्दिन अन्सारी – वसीम शेख वि. वि. नरेंद्र पाटील – वरद गजभिये २१-११, २१-१७.
३५ वर्षांखालील पुरुष एकेरी – हर्षद भागवत वि. वि. आदित्य काळे २१-१३, २१-१२.
३५ वर्षांखालील पुरुष दुहेरी – चैतन्य डोणे – सौरभ राय वि. वि. भूषण बर्वे – ओंकार केळकर १७-२१, २१-९, २१-१९.
४० वर्षांखालील पुरुष दुहेरी – सचिन मानकर – विनीत दबक वि. वि. दिगंत गुप्ता – निकेत लोखंडे २१-१७, २१-१७.
४५ वर्षांखालील पुरुष एकेरी – शरदचंद्र चावली वि. वि. चेतन शाह २०-२२, २१-१८, २१-११.
५० वर्षांखालील पुरुष एकेरी – महेश कुलकर्णी वि. वि. संजीव कुलकर्णी २१-१४, २१-१०.
५५ वर्षांखालील पुरुष दुहेरी – श्रीनिवास देवस्थळे – विनय दाते वि. वि. नितीन कोन्हर – रवी सारंगपाणी २१-१०, २१-१५.