भारतीय टपाल विभागाकडून पूना गेस्ट हाऊसचे टपाल तिकीट छापण्यात आल्याबद्दल सरपोतदार कुटुंबीयांचा सन्मान
पुणे: गेल्या ९० वर्षाहून अधिक काळ पूना गेस्ट हाऊस हे केवळ मराठी चित्रपट सृष्टी आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांसाठीच नव्हे तर प्रत्येक कलाप्रेमी पुणेकरांसाठी आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे जिव्हाळ्याचे स्थान आहे. पुण्यातील अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळाप्रमाणेच पूना गेस्ट हाऊस हे पुण्याचे वैभव आहे, अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.
पूना गेस्ट हाऊस च्या योगदानासाठी भारतीय टपाल विभागाकडून पूना गेस्ट हाऊसचे टपाल तिकीट छापण्यात आले आहे. यानिमित्त पूना गेस्ट हाऊसच्या सरपोतदार कुटुंबीयांचा सत्कार मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अजिंक्य देव यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर, दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार, सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आयुक्त माधव जगताप, सिटी पोस्टचे प्रमुख रामचंद्र जायभाय, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित विनायक कदम राजेश गिरे गणेश गिरे यावेळी उपस्थित होते.
अजिंक्य देव म्हणाले, माझे वडील रमेश देव आणि आई सीमा देव यांच्याबरोबर या ठिकाणी मी लहानपणापासून येत आहे, पूना गेस्ट हाऊस ने केवळ व्यवसाय केला नाही, तर माणसे जोडण्याचे काम केले, त्यामुळेच येथील माणसांचे आणि वास्तूचे सर्वसामान्यांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. पूना गेस्ट हाऊसचे स्थान हे केवळ खाद्य व्यवसायातच नव्हे तर सांस्कृतिक आणि चित्रपटसृष्टीतही महत्त्वाचे आहे.
सौरभ गाडगीळ म्हणाले, पूना गेस्ट हाऊस च्या नावाने टपाल तिकीट तयार होणे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असे अनेकदा म्हटले जाते परंतु सरपोतदार कुटुंबीयांनी गेल्या ९० वर्षांपासून हॉटेल व्यवसायांमध्ये केलेली प्रगती आणि त्यातून सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ पाहता हे विधान चुकीचे आहे, असे म्हणावे लागेल. सरपोतदार कुटुंबीयांप्रमाणे आपुलकी, जिव्हाळा आणि सचोटी असेल तर मराठी माणूस निश्चितच कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
विजय कुवळेकर म्हणाले, संगीतामध्ये ज्याप्रमाणे एखादे घराणे असते त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायामध्ये सरपोतदार हे महत्त्वाचे घराणे आहे. या घराण्याने केवळ मराठी चित्रपटसृष्टीची सेवा केली नाही तर ज्या ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या आयुष्याच्या उतरत्या काळामध्ये कोणताही आधार राहिला नाही, अशा कलाकारांची ही काळजी घेतली. पूना गेस्ट हाऊस हे केवळ एक हॉटेल नाही तर मराठी कलाकारांचे माहेरघर आहे. मराठी चित्रपट सृष्टीची आणि नाट्यसृष्टीतील जडणघडणीत या वास्तूचे मोठे योगदान आहे.
माधव जगताप म्हणाले, खाद्य व्यवसायामध्ये ९० वर्षे अविरतपणे पुणेकरांची सेवा केल्याचे फळ पूना गेस्ट हाऊसला टपाल तिकिटाच्या रूपाने मिळाले आहे. पूना गेस्ट हाऊस या मानाचे मानकरी सुद्धा आहेत. सर्वसामान्य ग्राहकांशी असलेल्या नात्याचे आणि कामाचा दर्जा टिकवून ठेवल्यामुळे पुना गेस्ट हाऊसचे स्थान प्रत्येकाच्या मनात कायम आहे.
मितेश गट्टे म्हणाले, पुण्याची खाद्य संस्कृती केवळ महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम पूना गेस्ट हाऊसने केले आहे. मराठी पदार्थांना कायम मानाचे स्थान त्यांनी आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुद्धा मिळवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी निश्चितच हॉटेल आणि इतर व्यवसाय केले पाहिजे.
प्रवीण कुमार पाटील म्हणाले, पूना गेस्ट हाऊस ही केवळ एक वास्तू नाही तर पुण्याची सांस्कृतिक ओळख आहे. त्यांनी या क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहिले नाही तर माणसे जोडण्याचे साधन म्हणून पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला भरभराट आली आहे. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.