रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची महत्त्वपूर्ण कामगिरी
● पेल्विक-युरोटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रेक्शन आजाराने पिडीत असलेल्या नवजात शिशूवरील शस्त्रक्रियेसाठी दा विंची रोबोटिक प्रणालीचा वापर करण्यात आला. मूत्रपिंडातील अडथळा दूर करण्यासाठी अशा पद्धतीची शस्त्रक्रिया झालेल्या या बाळाचा जगभरातील सर्वात लहान मुलांच्या यादीत समावेश झाला.
● रोबोटिक शस्त्रक्रियेदरम्यान शरीरावर लहान छेद केला जातो. त्यामुळे शस्त्रक्रियेतील आव्हाने टाळता येतात. रुग्णाला वेदना कमी होतात. प्रकृतीत लवकर सुधारणा दिसून येते.
पुणे 24 जून २०२५: ३५ दिवसांच्या बाळावर दुर्मिळ रोबोटिक शस्त्रक्रिया करत रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांच्या टीमने या नवजात शिशूला जीवनदान दिले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ मानली जाते. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रासलेल्या बाळावर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करुन घेणारे ३५ दिवसांचे बाळ हे जगातील सर्वात लहान रुग्णांपैकी एक ठरले आहे. मंगळुरु येथील दाम्पत्याने आपल्या नवजात शिशूवरील उपचारासाठी पुण्यातील रुबी क्लिनिल रुग्णालय गाठले होते. डॉक्टरांनी बाळाची शारिरीक तपासणी केली असता त्याच्या दोन्ही किडनीमध्ये पेल्विक-युरेटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन नावाचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. या आजारात मूत्रपिंडामधून मूत्राशयाकडे लघवीचा प्रवाह अडकल्याने रुग्णाला प्रचंड वेदना होतात, सूज येते, किडनीला कायमस्वरुपी नुकसान होण्याचा धोका असतो. या आजारातून नवजात शिशूला बरे करण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
रुबी हॉल क्लिनिकचे रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक आणि मुख्य रोबोटिक युरो-ऑन्को सर्जन डॉ. हिमेश गांधी यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. दा विंची रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. अतिशय गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरक्षितेतेने आणि अचूकरित्या करण्यासाठी दा विंची रोबोटिक प्रणालीचा वापर केला जातो. या पद्धतीचा अवलंब करत पेल्विक-युरेटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन आजाराने त्रासलेल्या ३५ दिवसांच्या नवजात शिशूची या आजारातून डॉक्टरांनी सुटका केली.
‘‘ नवजात शिशूंवर शस्त्रक्रिया करणे हे आव्हान असते. बाळाचे लहान अवयव, नाजूक ऊती यांमुळे शस्त्रक्रियेदरम्यान बाळाच्या जीवाला धोका संभवतो. या शस्त्रक्रियांमध्ये चुकीला वाव नसतो. ’’, असे डॉ. गांधी म्हणाले. रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये हा धोका टाळता येतो, असे सांगत त्यांनी रोबोटिक शस्रक्रियेबद्दल माहिती दिली. या शस्त्रक्रियेत आम्ही मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी वापरल्या जाणा-या सूक्ष्म उपकरणांचा वापर केला. ही रोबोटच्या हाताच्या मदतीने शस्त्रक्रिया केली गेली. बाळाच्या शरीरातील अनावश्यक भाग काढण्यासाठी रोबोटचे हात कामी आले. रोबोटच्या हाताचा वापर करुनच मूत्रपिंड पुन्हा मूत्राशयाला जोडले. आता बाळाला लघवीला त्रास होत नाही. बाळाच्या तब्येतीतही सुधारणा दिसून येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘’
रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्याचे अनेक फायदे आहेत. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील शस्त्रक्रियांमध्ये रोबोटचा वापर केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचा मुद्दाही डॉ. गांधी यांनी मांडला. या पद्धतीत रोबोटिक हातांमुळे शरीरात केवळ लहान छेद देता येतो. ही शस्त्रक्रिया अचूकपणे करता येते. अनावश्यक भागाजवळील ऊतींना फारसा त्रास न होता शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. शरीरावर कमी छेद दिले गेल्याने रुग्ण लवकर बरा होतो. दा विंची प्रणालीमुळे सर्जनला शस्त्रक्रिया होत असलेल्या संबंधित भागातील अंतर्गत हालचाली ३डी दृष्याच्या माध्यमातून पाहता येतात. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले नियंत्रण साधण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरते. या पद्धतीचा अवलंब केल्यास सर्जनला शरीलातील अरुंद जागेतही प्रभावीपणे काम करता येते. हे अद्यायावत तंत्रज्ञान केवळ शस्रक्रिया अचूक पद्धतीने करुन कमीतकमी वेळेत पूर्ण करण्यास मदत करते. यामुळे गुंतागुंत टाळता येते. लहान मुलांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो. रुग्णाची सुरक्षितता वाढते शिवाय रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा लवकर दिसून येते.
ही शस्त्रक्रिया पुण्यातील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या ऐतिहासिक नोंदीतील दुर्मिळ आणि अविस्मरणीय घटना म्हणून पाहिली जात आहे. या शस्त्रक्रियेमुळे पुणे हे शहर वैद्यकीय क्षेत्रातही नावाजले जाईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. बालरोग व मूत्रविकारांवरील गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक शस्त्रक्रिया पुण्यात उपलब्ध झाल्या आहेत. या आजारांवरील मागणीसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे शहर म्हणून पुण्याला नवी ओळख मिळाली आहे. आठ वर्षांपूर्वी डॉ. हिमेश गांधी यांनी २०१७ साली पुण्यातील मूत्रपिंड व पोस्ट्रेड कर्करोगाच्या रुग्णावर पहिल्यांगा रोबोटिक शस्त्रक्रिया केली होती. याच वर्षी रुबी हॉल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया आणि साधनसामग्री उपलब्ध झाल्या. पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक रोबोटिक प्रणाली सुरु करणारे रुबी हॉल क्लिनिक एकमेव रुग्णालय ठरले. रुबी हॉल क्लिनिकचे रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक आणि मुख्य रोबोटिक युरो-ऑन्को सर्जन डॉ. हिमेश गांधी यांनी आतापर्यंत ५४०हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी पोस्ट्रेड तसेच मूत्रपिंडाच्या कर्करोगाने त्रासलेल्या प्रौढांपासून ते जन्मजात विकास असलेल्या लहान मुलांवरही शस्त्रक्रिया केली आहे. हे सर्व रुग्ण आता नव्याने आयुष्य जगत आहेत. डॉ. गांधी यांच्या योगदानामुळे पुणे हे शहर रोबोटिक शस्त्रक्रियेचे शहर म्हणून उदयास येत आहे.
पुण्यात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु झाल्याने रुग्णांचा मुंबई, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांच्याऐवजी पुण्यात येण्याचा ओघ वाढत असल्याचा मुद्दा डॉ. हिमेश गांधी यांनी मांडला. गेल्या आठ वर्षांत पुण्यात रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होत गेल्या. मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमधील अनेक केंद्रांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रमाण जास्त आहे. या दोन शहरांमधील रोबोटिक शस्त्रक्रियांचा ओघ जास्त असला तरीही पुण्यातही आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या जात आहेत. मुंबई किंवा दिल्ली गाठण्याऐवजी रुग्ण पुण्याला पसंती देत आहेत.
डॉ. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ब-याच शल्यचिकित्सकांना रोबोटिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाले आहे. दिल्ली, जयपूर आणि अहमदाबाद यांसारख्या अनेक शहरांत त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या शहरांत आता अत्याधुनिक रोबोटिक उपचारप्रणाली सुरु झाली आहे. डॉ. गांधी यांच्या अथक प्रयत्नांमुळे असंख्य रुग्णांना नवे जीवनदान मिळाले आहे.