तुळशीबाग व्यापारी कट्टा अंतर्गत मुलाखत
पुणे: व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून न बघता आनंद म्हणून बघायला पाहिजे. काहीतरी वेगळे करण्यासाठी जिद्द असावी लागते. पैशांपेक्षा आपण कमावलेले माणसे हा नफा असला पाहिजे. चांगले गिऱ्हाईक, चांगले कारागीर असतील तर व्यवसाय आपोआपच चांगला होतो. व्यवसाय वाढतो तेव्हा ती कला राहत नाही तर व्यवसाय हे विज्ञान होते. व्यवसायात आकडेवारी, माहिती ही फार महत्वाची असते, असे मत पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त ‘तुळशीबाग व्यापारी कट्टा’ या विशेष मुलाखत सत्रातून पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांचा उद्योग प्रवास उलगडण्यात आला. पूना गेस्ट हाऊस येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी गाडगीळ यांची मुलाखत घेतली. यावेळी अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम उपस्थित होते.
पुणे शहर हे सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर आणि आता माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु पुणे शहर हे व्यापाऱ्यांचेही शहर असून येथील काही व्यापाऱ्यांनी पुण्यातच नव्हे तर देशात परदेशात आपला नावलौकिक केला आहे. अश्याच पुण्यातील प्रथितयश व्यापारी आणि उद्योगपती यांची यशोगाथा तुळशीबाग व्यापारी कट्ट्याच्या माध्यमातून उलगडणार आहे.
दर सोमवारी सदर कट्टा लक्ष्मी रस्त्यावरील ऐतिहासिक पूना गेस्ट हाऊस या वास्तूत सुरु केला आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाल्यांचे संजय चितळे यांच्या मुलाखतीने तुळशीबाग व्यापारी कट्टा सुरु झाला. तसेच जयराज बासमती चे राजेश शहा, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, हाॅटेल सुकांता चे विजयकुमार मर्लेचा यांच्या सदर कट्ट्यावर मुलाखती झाल्या असून व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती सुद्धा होणार आहेत.
सौरभ गाडगीळ म्हणाले, पुण्यातील ग्राहक जितका चोखंदळ आहे. तितकाच तो प्रेम करणारा देखील आहे. इतर शहरातील ग्राहक मनासारखी डिझाइन मिळाली नाही तर इतर दुकानात जातात परंतु पुणेकर ग्राहक हवी ती डिझाइन पीएनजी मध्येच बनवून द्या असे सांगतात. त्यामुळे पुणेकरांसारखे निष्ठावान ग्राहक कुठेच नाहीत. एकूण ग्राहकांपैकी ४५ ते ५० टक्के ग्राहक हे पीएनजीमध्ये कायम येणारे आहेत. मी व्यवसायात येण्यापूर्वी व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन खूप पारंपरिक होता. नवीन गोष्टी लोकांना दाखविण्यासाठी ब्रॅण्डिंगची गरज असते, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, अडचणी येतात, निर्णय चुकतात, नुकसान होते, पण या सगळ्यातून शिकायला हवे. तरुण उद्योजक आणि आताची पिढी यांच्यासाठी आजच्या काळात खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, कारण स्टार्टअप संस्कृतीचा उदय झाला आहे. स्वप्न पाहून जर दररोज त्या स्वप्नांसोबत जगायला लागलो, तर ती स्वप्ने पूर्ण होतात. शॉर्टकटचा मार्ग नको, असेही त्यांनी सांगितले.