मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी येणारे पाहूणे, अभ्यागतांच्या पाहूणचारासाठी सरकारने दीड कोटी रुपयांचे कंत्राट छत्रधारी कॅटरर्स या कंपनीला दिले आहे. ९ एप्रिल २०२५ पर्यंत ही कंपनी सेवा देणार असून त्यासाठी दीड कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटदाराला दरही ठरवून दिले आहेत. अभ्यागतांना मात्र त्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील खानपान सेवाही छत्रधारी कॅटरर्स याच कंपनीकडे आले. तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्विसेसकडे सोपवण्यात अालेेले आहे. कंत्राटदार छत्रधारी कॅटरर्स यांना नोंदणी फी, मुद्रांक शुल्क व ३% अनामत रकमेची बँक गॅरंटी ठेवावी लागेल, अशी अट घालण्यात आली. विशेष महत्वाच्या प्रसंगी आवश्यकतेनुसार बाहेरुन अथवा अन्य पुरवठादाराकडून खाद्यपदार्थ मागविणे अथवा खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांस प्राधिकृत केले आहे.
कोथिंबीर वडी, रसमलाई, मोदकही मिळणार
१२५ मिली दुधाचा चहा- १८ रुपये, १२५ मिली कॉफी – १३ रुपये, शीतपेये – १५ रुपये, चिकन बिर्याणी-३५ रुपये, व्हेज थाळी-९५ रुपये आणि मांसाहारी थाळी ९८ रुपये असे दर टेंडरमध्ये निश्चित करण्यात आले आहेत.
कोथिंबीर वडी १५ रुपये, रसमलाई १८ रुपये, समोसा १५ रुपये, मसाला चहा व ग्रीन टी १४ रुपये, व्हीआयपी स्पेशल व्हेज स्नॅक्स १२० रुपये, व्हीआयपी स्नॅक्स ४० रुपये व मोदक १८ रुपये. स्पेशल व्हेज नॉन आणि नॉन व्हेज बुफे डिनर ३५० रुपये ही उपलब्ध खाद्यपदार्थापैकी सर्वात महाग डिश असेल.

