तुमच्या बापाने तर वडिलांनाच वनवासात पाठवले
ठाणे -राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला आहे. आव्हाड यांच्या घराबाहेर प्रभू श्रीरामांचे चित्र घेऊन हे कार्यकर्ते आरती करण्यासाठी पोहोचले होते. याप्रकरणी स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी आरती करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडले. तर दुसरीकडे भाजपकडून आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. घटनेनंतर आव्हाड यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तुमच्या बापाने तर वडिलांनाच वनवासात पाठवले
आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ”माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही ! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत”. असे आव्हाड म्हणाले
आव्हाड यांचे वक्तव्य काय?
राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हे आमचे, बहुजनांचे आहे. शिकार करून खाणारे राम हे बहुजनांचे आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे आव्हाड यांनी म्हंटले होते.
दरम्यान, येत्या 22 जूनला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. त्यावरून भाजपा आणि विरोधक असा सामना रंगला आहे. त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशातच, जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केल्याने आता यावरून वेगळाच वाद निर्माण झाला आहे.

