श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणे ; महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा थाटात साजरा
पुणे : टाळ-मृदुंगांचा गजरात श्री जंगली महाराज भजनी मंडळाचे भजनकरी पालखीची मिरवणूक घेऊन पारंपारिकरित्या गेल्या १३५ वर्ष परंपरेप्रमाणे श्री रोकडोबा मंदिरापासून जंगली महाराज समाधी मंदिरामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. त्यानंतर मंदिरात तयार केलेला १ हजार किलो गव्हाच्या खिरीचा महाप्रसाद हनुमान जयंतीच्या दिवशी जवळजवळ चार ते पाच हजार भाविकांना देण्यात आला. महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता पौर्णिमेला खिरीच्या प्रसादाने झाली.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येतो. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले. महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक श्री रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथून शिवाजीनगर गावठाण परिसरात काढण्यात आली. टाळ-मृदुंगांचा गजर आणि कपाळी गुलाल-बुक्का लावून भाविक मिरवणुकीत मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.
मंदिरात तब्बल २३० किलो गूळ, २१० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि २० किलो ड्रायफ्रुट वापरुन सलग ६ ते ७ तास सुमारे १० ते १२ सेवेक-यांनी १००० किलो गव्हाच्या खिरीचा प्रसाद तयार केला. भव्य कढईमध्ये खीर तयार करतानाचे दृश्य पाहण्याकरिता देखील भाविकांनी मोठी गर्दी केली. खिरीचा प्रसाद हे सन १९६५ पासून उत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

भव्य कढईमध्ये मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या पटांगणात हा प्रसाद केला जातो. मोठया संख्येने भाविक हा प्रसाद ग्रहण करण्याकरिता येतात. याशिवाय उत्सवात विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने झाली. तसेच संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम पार पडले. विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम देखील उत्साहात झाले. संपूर्ण उत्सवात मंदिराला आकर्षक व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.