मुंबई-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंकडून 5 लाख रुपयांचे बिल घेतले होते. एवढेच नाही तर हे रुग्णालय धर्मादाय पद्धतीचे असूनही त्यातील 7 वा मजला हा पूर्णतः मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. धर्मादाय रुग्णालय असूनही येथे तपासणीसाठी 20 रुपयांऐवजी 600 रुपये घेतले जातात, असे ते म्हणालेत.
विजय वडेट्टीवार शनिवारी पत्रकारांशी बोलताना मंगेशकर कुटुंबीयांचे वेगवेगळे किस्से सांगितले. ते म्हणाले, दीनानाथ रुग्णालयाचा 7 वा माळा मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव आहे. तिथे ते व त्यांच्या आप्तेष्टांचे उपचार होतात. हे चॅरिटी हॉस्पिटल आहे. पेशंट तपासणीसाठी आला की त्याला 20 रुपये घ्यावे लागतात. पण इथे 600 रुपये घेतले जातात. ही लूट नाही का? जर हे दीनानाथ हॉस्पिटल सत्ताधारी आमदारांच्या पीएकडून 10 लाख रुपये घेतल्याशिवाय उपचार करू शकत नाही, तर गरिबांची सेवा करणारे रुग्णालय आहे का? हे चॅरिटी हॉस्पिटल आहे का? याचाही विचार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करावा. उगीच भावनेच्या भरात काहीतरी वाचवण्याचा व सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. मी कुणावरही टीका करत नाही. मी केवळ वस्तुस्थिती मांडत आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, प्रकाश आमटे यांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळी एका मध्यस्थीने दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाला उपचारासंबंधी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आमटे यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. त्यांनी आम्ही प्रकाश आमटेंकडून एकही रुपया घेणार नाही, त्यांच्यावर मोफत उपचार करू अशी ग्वाहीही दिली. पण नंतर बाहेरून औषधी मागवण्याचे कारण सांगत आमटे यांच्या आप्तेष्टांकडून 5 लाख रुपये वसूल केले.
ते पुढे म्हणाले, परभणीला एक साहित्य संमेलन होते. नारायण सुर्वे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमात आशाताई भोसले यांच्या गायनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. तेथील तत्कालीन खासदारांचे नाव मला आठवत नाही. पण ते आशादीदींकडे गेले. त्यांनी त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. पण त्यांनी त्यांच्याकडे 2 लाख रुपये देण्याची मागणी केली. नंतर कार्यक्रम जवळ आल्यानंतर त्यांनी पुन्हा 3 लाख रुपयांची मागणी केली. आयोजकांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बधल्या नाहीत. पैसे मिळाल्याशिवाय मी येणार नाही असे त्या म्हणाल्या.
चेक नको, रोख द्या, आणि पावती मिळणार नाही या हट्टाने कार्यक्रम रद्द
वडेट्टीवार यांनी यावेळी आणखी एका कार्यक्रमाचाही किस्सा सांगितला. ते म्हणाले, नागपूर कॉर्पोरेशनचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी लतादीदींनी विदर्भ साहित्य संमेलनाच्या मंचावर मोफत गाण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आयोजकांनी कार्यक्रमाची तारीख ठरवून त्यांच्याशी संपर्क साधला. तिकडून निरोप आला की, आमची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करा. आमच्या वाद्य संचाला तुम्हाला पैसे द्यावे लागतील. एवढेच नाही तर आमच्यासाठी विशेष विमानाचीही सोय करावी लागेल. त्यावर आयोजकांनी यासाठी किती खर्च येईल अशी विचारणा केली. त्यावर त्यांना 22 लाख लागतील असे सांगण्यात आले.त्यानंतरही आयोजकांनी लतादीदींच्या कार्यक्रमासाठी एवढा मोठा खर्च करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी या रकमेचा चेक देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांनी हे पैसे चेकने नव्हे तर कॅशमध्ये मागितले. त्यावर आयोजकांनी आमची नोंदणीकृत संस्था आहे. त्याचे ऑडिट होते. त्यामुळे आम्ही तुम्हाला रोख रक्कम देऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली, पण त्याची रिसिप्ट मागितली. मंगेशकर ही रिसिप्ट देण्यासही तयार झाले नाही. त्यानंतर लतादीदींशी संपर्क साधण्यात आला. पण लतादीदींनी हृदयनाथ जे सांगेल तेच होईल असे सांगत आयोजकांना परत पाठवले. यामुळे हा कार्यक्रमच रद्द करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. अर्थात पैशांशिवाय आम्ही गाणार नाही हा त्यांचा उद्देश होता.
पंडित नेहरूंपुढेही मोफत कार्यक्रम झाला नाही
विजय वडेट्टीवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे मंगेशकरांचा झालेला गायनाचा कार्यक्रमही मोफत नव्हता असा दावा केला. ते म्हणाले, जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे गायनाचा कार्यक्रम ठरला होता, त्यावेळी लतादीदींना नव्हे तर आशादीदींना असाईमेंट देण्यात आले होते. आशादीदींकडून ते लतादीदींनी घेतले. त्या गायल्या. पण तो कार्यक्रमही मोफत नव्हता. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो की, त्या मोफत गायल्या नव्हत्या.