शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संपावर जाण्याचा निश्चय केला आहे. अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदनिश्चिती करावी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध 10 मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. त्यातील किरकोळ मागण्या या देवस्थान ट्रस्टकडून पूर्ण करू असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र मुख्य दोन मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.
काय आहेत मागण्या?
- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा.
- अनुकंपा तत्वावर वारसास नोकरी मिळण्यात यावी.
- वेतनश्रेणीनुसार 2003 ते 2023 फरक अदा करावा.
- निवृत्तीचे वय 58 वरून 60 करावे कर्मचाऱ्यांचे अनुभव शैक्षणिक पात्रतेनुसार हुदा पदनिश्चिती लागू करावी.
- कर्मचाऱ्यांना व कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सेवा मोफत मिळावे.
अशा विविध मागण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर पासून मंदिरातील जवळपास साडेतीनशे कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत याच दिवशी नगर येथील निवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व कर्मचारी मोर्चा करणार असून महा मुक्काम करण्याचे पत्र देवस्थान युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर रामदास शिंदे उपाध्यक्ष अनिल सोपान शेटे यांनी दिली. साडेतीनशे ते चारशे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच विविध मागण्यासाठी संपाची हाक दिल्याने येथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
शनिशिंगणापूर देवस्थानचे सर्व कर्मचारी येत्या दिनांक 25 डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. या संदर्भात देवस्थानच्या कामगार युनियनच्या वतीनं देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात 25 मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत.