कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आम्रमहोत्सव व लंके यांचा विशेष सन्मान
पुणे : देशात कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता आहे. शरदचंद्र पवार आरोग्यमंदिरात म्हणजेच कोविड सेंटरमध्ये ५५ लहान मुले आहेत. तिस-या लाटेला सामोरे जावे लागणार आहे, अशी शक्यता असल्याने आम्ही परदेशातील भारतीय डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांचेही मार्गदर्शन घेत आहोत. त्यामुळे तिस-या लाटेतून यशस्वीपणे लहान मुलांना बाहेर काढू, असा विश्वास अहमदनगर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
वैशाख पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आम्रमहोत्सव व चंदन उटीचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. आम्रमहोत्सवात देसाई बंधू आंबेवाले चे नरेंद्र देसाई यांनी अर्पण केलेल्या २२१ आंब्यांची आरास करण्यात आली. तसेच रौप्य मूर्ती व पादुकांवर चंदनउटीसह डाळ-कैरी, पन्हे असा नैवेद्य दाखविण्यात आला. यशोधन शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.
कोरोना काळातील आ. निलेश लंके यांच्या कार्याबद्दल ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी दत्तमहाराजांची आरती, देवदासी भगिनींना भोजन व आम्रमहोत्सवातील आंबे वाटप त्यांच्या हस्ते झाले. तसेच लंके यांच्या कोविड सेंटर कार्याला ट्रस्टचे विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची मदत दिली.
निलेश लंके म्हणाले, कोरोनाच्या महामारीमध्ये आपण अहोरात्र कष्ट करीत आहोत. परंतु ज्या पद्धतीने यश येणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे यश मिळत नाही. त्यामुळे परमेश्वराला प्रार्थना करणे गरजेचे आहे. पुण्यामध्ये येऊन दत्तमहाराजांकडे मी तीच प्रार्थना करीत आहे. प्रत्येक आमदाराने कोरोना काळात चांगले काम केले आहे. यापुढेही असेच काम सुरु राहिल, असेही त्यांनी सांगितले.
