पुणे – शहरासह राज्यस्तरावरील गुणवान व उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गॉडविट एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे दुसर्या बॅट्टोग्रीन महाकबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरूष व महिला गटांत दि. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे रंगणार आहे.
बाबुराव चांदेरे म्हणाले कि, आता कबड्डीला चांगले दिवस येत आहेत . महाराष्ट्राच्या मातीतल्या या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणगान होईल या दृष्टीने आम्ही वाटचाल सुरु केली आहे .
गतवर्षी १५ मे ते ७ जून २०१५ या कालावधीत पहिल्या मोसमात महाकबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुण्यातील गॉडविट एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पुणे महापालिकेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे , गॉडविट एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेंद्र देशमुख आणि निलेश लोखंडे आणि बॅट्टोग्रीन महाकबड्डी लीगचे सीईओ सिध्दार्थ मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
गॉडविट एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेंद्र देशमुख म्हणाले की, ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकी ४ संघ अशी दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेत पुरूष अ गटात ठाणे टायगर्स्, कोल्हापूर हरिकेन्स्, पुणे पँथर्स, रत्नागिरी रायडर्स यांचा, तर ब गटात सांगली रॉयल्स्, रायगड डायनामोज्, मुंबई महाकाल, पिंपरी चिंचवड चॅलेंजर्स् यांचा समावेश आहे.
महिला अ गटात ठाणे टायगर्स, सांगली रॉयल्स, पिंपरी चिंचवड चॅलेंजर्स, मुंबई महाकाल यांचा, तर ब गटात कोल्हापूर हरिकेन्स, रत्नागिरी रायडर्स, पुणे पँथर्स, रायगड डायनामोज यांचा समावेश आहे.
तसेच, प्रत्येक संघात एकुण १५ खेळाडूंचा समावेश असणार असून यामध्ये १ मॅनेजर व १ प्रशिक्षक यांचा समावेश असणार आहे. संघातील ७ खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून ८ खेळाडू संघाच्या मालकांच्या पसंतीचे असणार आहे.