मुंबई-आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. बच्चू यांनी जामिनासाठी गिरगाव कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.
राजकीय आंदोलनातील एका प्रकरणामध्ये बच्चू कडू हे आरोपी होते. त्यांच्याविरोधात गिरगाव कोर्टाने अजामीन वारंट काढले होते. त्यानुसार बच्चू कडू हे गिरगाव कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी बच्चू कडूंनी जामिनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
पोलिसांनी कडू यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयीन कोठडी ही 14 दिवसांची असते. त्यामुळे यादरम्यान बच्चू कडू पुन्हा जामिनासाठी अर्ज करतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.