वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ‘सुर्यदत्ता’च्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम
पुणे : सलग एक तास सव्वाशे ते दीडशे लोकांनी मिसाईलमॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘इग्नायटेड माईन्ड्स’ आणि ‘टर्निंग पॉईंट्स’ या पुस्तकाचे वाचन करून त्यांना अभिवादन केले. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे वाचन करीत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा केला.
कोरोनामुळे महाविद्यालयात विद्यार्थी नसले तरी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे सर्व दिवस नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे केले जात आहेत. वाचन प्रेरणा दिवसानिमित्त डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. शेफाली जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “अखेरपर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची वृत्ती डॉ. कलमांची होती. ज्ञान वाटल्याने वाढते. ते जवळ न ठेवता सतत वाटत राहिले पाहिजे, असे कलाम सांगत असत. संस्थेतील शिक्षकांकडून त्यांचे कार्य प्रत्यक्षात आणले जातेय, ही आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील संवाद असाच वाढत राहिला, तर त्यांच्यात चौकस बुद्धी विकसित होईल. त्यातून उद्याचा भारत आणखी उज्ज्वल बनेल.”
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “वाचन हेच माणसाच्या जडणघडणीला आकार देणारे असते. डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कोरोनामुळे विद्यार्थी-शिक्षक असा एकत्रित कार्यक्रम शक्य नसला, तरी शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे डॉ. कलाम यांच्या पुस्तकाचे वाचन करून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील प्रत्यक्ष संवाद लवकरच व्हावा आणि ज्ञानदानाचे कार्य पुन्हा सुरु व्हावे.”
प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.