संविधान सन्मान रॅलीतुन पुलवामातील शहीदांना अभिवादन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाची सुरुवात संविधान सन्मान रॅलीने झाली. सायंकाळी शिवाजीनगर एआयएसएसपीएमएस शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून संविधान सन्मान रॅलीला सुरवात झाली.
पुलवामातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा संविधान सन्मान रॅली साध्या पद्धतीने काढण्यात आली. तसेच कँडल मार्च काढून हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करण्यात आले. ‘शहीद जवान अमर रहे’चा नारा देत ही रॅली पुणे महापालिका परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत आली. तेथे महात्मा फुले यांना अभिवादन करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विचाररथावरून विविध सामाजिक संदेश देण्यात आले. मेणबत्त्या लावून शहीद जवानांप्रती आदराची भावना व्यक्त केली.
यावेळी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनीता वाडेकर, माजी संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर, माजी न्यामूर्ती रोहिदास गायकवाड, प्रा. डॉ. विजय खरे, प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, दीपक म्हस्के, प्रा. किरण सुरवसे, अमरनाथ सिंग, राजाराम भैलुमे, धर्मराज निमसरकर, कुमार आहेर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे, जी. के. ऐनापुरे, परशुराम वाडेकर यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
संमेलनाचे उद्घाटन
सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे आज गुरुवारी (दि. २१) दुपारी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमालकर आदी उपस्थित राहणार आहेत. संविधान नागरी, बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा रंगणार आहे.