पुणे : “प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता नव्या भूमिकेसाठी इच्छूक आहे. नोकरीच्या कार्यकाळात पासपोर्टचा चेहरा बदलला. आता लोकसेवक होऊन देशाचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा आहे. समाजातील दुजाभाव, भेद संपवण्यासाठी मला काम करायचे आहे. त्यासाठी मला आपली सोबत हवी असून, ती मिळाल्यास मी कुठेही कमी पडणार नाही,” अशी भावना निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी व्यक्त केली.
सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कारां’चे वितरण विद्यावाचस्पती पंडित डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. सन्मानचिन्ह, मानपत्र व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा पुरस्कारांचे १७ वे वर्ष होते. बावधन येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्याला लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी. बी. शेकटकर (निवृत्त), प्रसिद्ध कवी शैलेश लोढा, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, अभिनेता रझा मुराद, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, डॉ. विनोद शहा आदी उपस्थित होते.
ग्रॅमी पुरस्कारप्राप्त पद्मभूषण विश्वमोहन भट्ट (भारतीय शास्त्रीय प्रदर्शन कला), ज्ञानेश्वर मुळ्ये (प्रशासकीय सेवा), हुकमीचंद चोरडिया (ग्लोबल आंत्रेप्रेन्युअरशीप), पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अरविंद नातू (विज्ञान-तंत्रज्ञान), रमणलाल शहा (ज्योतिषशास्त्र), शक्ती कपूर (चित्रपट व कला), असितकुमार मोदी (निर्मिती-दिग्दर्शन), फारुक मास्टर (वैद्यकीय सामाजिक सेवा), शाम अगरवाल (पत्रकारिता) यांना ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’, तर पद्मश्री मिलिंद कांबळे (औद्योगिक सामाजिक सेवा), रितु प्रकाश छाब्रिया (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी), विष्णू मनोहर (हॉस्पिटालिटी मॅनेजमेंट), डॉ. अर्चिका सुधांशू (अध्यात्म), संदीप गादिया (सायबर सुरक्षा), विजय भंडारी (सामाजिक उद्योगता व मानवता), मनिष पॉल (मनोरंजन), सुरी शांदिया (बँकिंग अॅन्ड फायनान्स), डॉ. शैलेश गुजर (माध्यम व जनसंपर्क), बीके सुजाथाबेन राठी (वैद्यकीय संशोधन), निवेदिता साबू (फॅशन डिझाईन), मानसी गुलाठी (आरोग्य), विपुल कासार (स्टार्टअप व इनोव्हेशन), अंकिता श्रॉफ (महिला उद्योजक) यांना ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
ज्ञानेश्वर मुळ्ये म्हणाले, “१३० कोटींच्या देशात केवळ आठ कोटी लोकांकडेच पासपोर्ट आहेत. पासपोर्ट विभागाचा कार्यभार सांभाळताना ७७ पासपोर्ट केंद्रावरून ४५० केंद्र निर्माण झाली. अनेक लोक पासपोर्टकडे वळली, याचा आनंद आहे. संत-समाजसुधारकांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या छोट्याशा गावातून आल्याने समाजातील वंचित घटकांची जाणीव आहे. गावाशी नाळ आजही कायम आहे. समाजसेवेच्या भावनेतून यापुढे काम करण्याची इच्छा आहे.”
पंडित डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले, “आपल्या कार्याला अध्यात्माचे अधिष्ठान असल्याशिवाय त्याची चांगली फलप्राप्ती होत नाही. माणूस जोडण्यावर आपण भर दिला पाहिजे. सूर्यदत्ता शिक्षणसंस्थेने अशी असंख्य माणसे जोडली असून, विद्यार्थ्यांमध्ये मूल्यभाव रुजविण्याचे काम डॉ. चोरडिया करीत आहेत.”
डॉ. डीबी शेकटकर म्हणाले, “राष्ट्रभक्तीसाठी राष्ट्रशक्ती चे कवच आवश्यक आहे. युवकांतील ही राष्ट्रशक्ती घडविण्याचे काम शिक्षणसंस्थांनी करावे. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ते काम करीत आहे, याचा आनंद वाटतो. मातेचे संस्कार आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. नारींचा सन्मान व्हावा, तेथे देवता वास करते.”
शक्ती कपूर म्हणाले, “सर्वांना परवडेल अशा पद्धतीचे शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे. युवकांनी आपले चारित्र्य निर्माण केले पाहिजे. विविध क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींना विद्यार्थ्यांसमोर आणून ‘सूर्यदत्ता’ने चारित्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तारुण्यात मजा करण्यासह गांभीर्याने अभ्यासही करावा.”
डॉ. अरविंद नातू म्हणाले, “शिक्षणात तंत्रज्ञानाने क्रांती आणली आहे. डिजिटायटेशन, डिकार्बोनेशन आणि डिमॉनेटायझेशन या तीन गोष्टी भविष्यात महत्वाच्या आहेत. येत्या काळात विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती येईल. जिथे त्यांना अभ्यासक्रम, परीक्षांचे स्वरूप ठरवता येईल. घरूनच अभ्यासही करता येईल.”
हुकमीचंद चोरडिया म्हणाले, “प्रवीण व सुहाना मसाल्याच्या उत्पादनांत दर्जा आणि ग्राहकाभिमुख सेवा दिल्यानेच यश मिळाले. आजच्या तरुणांत प्रचंड उत्साह आहे. यश-अपयशात कार्याचे मोजमाप नसते. आपल्या कामातील सातत्य आणि निष्ठा हेच आपल्याला यशाकडे नेतात.”
असितकुमार मोदी म्हणाले, “लोकांनी हसत आणि हसवत राहिले पाहिजे. आजच्या या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. आणखी चांगल्या विनोदी मालिका माझ्याकडून होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करतो.”
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक-मनाच्या तंदुरुस्तीला प्रोत्साहनासाठी या व्यक्तींचे मार्गदर्शन प्रेरक ठरेल.”
विश्वमोहन भट, सुरेश तळवलकर, श्याम अगरवाल, विश्वेश कुलकर्णी, डॉ. फारूक मास्तर, विष्णू मनोहर, विजय भंडारी, निवेदिता साबू, मनीष पॉल, रझा मुराद, उल्हासदादा पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सुनील धनगर व नुपूर पिट्टी, डॉ. किमया गांधी, स्नेहल नवलखा यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.