पुणे: समईच्या मंद उजेडात चमकणारी दाक्षिणात्य थाटातील गायन आणि त्याच्या तालावर मनोहारी विभ्रम करत लयीत, डौलदारपणे पदन्यास करणारी नर्तिका आणि मंत्रमुग्ध होऊन पाहणारे प्रेक्षक.. हे दृश्य होते भरतनाट्यम नृत्यांगना जिजा परांजपे हिच्या “राम वरदायिनी” एक नृत्यसेतू या अरंगेत्रम सादरीकरण सोहळ्यातील. कोथरूडमधील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे हा नृत्याचा कार्यक्रम झाला. नृत्यभक्ती फाउंडेशनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गुरु सई परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे धडे घेणारी नृत्यांगना जिजा हिने अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात जिजाने श्रीराम जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्याचा हुबेहूब प्रसंग भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटेतून सादर केला. कार्यक्रमाला सिंबोयसेसच्या मुख्याध्यापिका वीणा हवनूरकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमात जिजाने आदिताल वर आधारित श्रीराम कौतुकम, रागमालिका या रागावर आधारित नवरस रामायणा, तालमालिका रागावर आधारित जतीस्वरम, चक्रवकम रागावर आधारित वरनम, आदिताल रागावर आधारित हनुमान चालिसा आणि पदम, रामराज्याभिषेक या प्रकाराचे सादरीकरण केले. जिजाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला.
या कार्यक्रमात निवेदन अशितोष परांजपे, तन्मय जक्का यांनी दिली. वेशभूषा लहेजा सई, कार्ड डिजायनर हर्षल वावळे, व्हिडिओ केदार गोडबोले यांनी केला.
अरंगेत्रम सादर करणे हे प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. भरतनाट्यम नृत्यशैलीतील एका विशिष्ट पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच अरंगेत्रम् सादर करण्याची परवानगी असते. यामध्ये विविध प्रकारातील नृत्यरचना सलग सादर कराव्या लागतात. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.