केवळ पाऊस नव्हेतर काटेकोर, दीर्घकालीन नियोजनाचा, दृष्टीचा अभाव असणारे धोरण कर्ते ही पुण्याची समस्या !
पुणे- पाऊस हि समस्या नाही तर नैसर्गिक नद्या , नाले ,जलस्त्रोत यांच्यावर आक्रमण करणारे राजकर्ते आणि त्यांना साथ देणारे प्रशासक हि खरी समस्या आहे ,सध्या येणारे पूर हि नैसर्गिक नाही तर अशा धोरणकर्त्यांच्या कृत्यांनी येणारी आपत्ती आहे याकडे आता आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी लक्ष वेधले आहे .पाऊस तास २ तास झाला ,रात्रभर नाही झाला अशी पुष्टी जोडून त्यांनी आता तरी पुणेकरांनी जागे व्हावे असे आवाहन केले आहे .
ते म्हणाले,’ गेल्या दोन दिवसात प्रचंड पावसामुळे पुणे शहर तुंबलेले पाहायला मिळाले. खरंतर 2019 मधील धडकी भरणारा पाऊस व त्याच्यामुळे आंबील ओढा , इतर परिसरात झालेली जीवित हानी याची अंगावर काटा आणणारी आठवण पुणेकरांना पुन्हा झाली. वस्तूतः 2019 मध्ये आणि आत्ता 2022 मध्ये म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये आपण काहीही शिकलो नाही याचं हे दर्शक आहे. आज राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांना दोष देताना पाहायला मिळाले प्रत्यक्षात गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये ओढे नाले बुजवणे, रस्त्याच्या कडेचे पाणी वाहून जाणारे ड्रेनेज बंद होणे, सिमेंट काँक्रीटचे थर ,पावसाचे पाणी व मैला विसर्जन यासाठीच्या पाईपलाईनची क्षमता अपुरी असणे.उंच सखल पणाचा विचार केलेला नसणे, सफाई केलेली नसणे, सखल भागात बांधकामे करणे आदी बाबी कारणीभूत आहेत असे दिसते.
परंतु 50 ते 100 वर्षासाठी एखादी वास्तू, एखादी जागा भाड्याने व वापरासाठी देण्यासाठी अत्यंत तत्पर असणारे नगरसेवक आणि प्रशासन, या पाऊस पाणी नियोजनामध्ये मात्र पाच वर्षाचा सुद्धा विचार करत नाहीत असेच दिसते. त्यामुळेच वाहतूक आराखडा, रस्ते नकाशे, उड्डाणपूल, नदी प्रकल्प या सर्वच बाबी तत्कालीन फायद्यासाठी,आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी फेरफार करीत ठरवल्या जात आहेत. यामुळे शहर तुंबण्याला सध्याचे प्रशासन व आधीचे सत्ताधारी म्हणजे भाजप आणि त्यापूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी पुणेकरांना ज्या समस्यांना तोंड द्यायला लागत आहे, त्यावर गंभीरपणे चर्चा होण्याची गरज आहे. भाजप व राष्ट्रवादी याबाबत पुरेशे संवेदनशीलच नाहीत असेच म्हणावे लागेल. काटेकोर, दीर्घकालीन नियोजन हाच एकमेव पर्याय आहे.